...तर पक्षाला आणि नेतृत्वालाही त्याची किंमत मोजावी लागते; बीडमध्ये अजित पवार बोलता बोलता बरंच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:28 IST2025-04-02T12:26:59+5:302025-04-02T12:28:02+5:30

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगारी घटनांपासून दूर राहण्याचा कानमंत्र अजित पवार यांनी बीडमधील कार्यक्रमादरम्यान दिला आहे.

the party and the leadership also have to pay the price Ajit Pawar statement in beed speech | ...तर पक्षाला आणि नेतृत्वालाही त्याची किंमत मोजावी लागते; बीडमध्ये अजित पवार बोलता बोलता बरंच बोलले!

...तर पक्षाला आणि नेतृत्वालाही त्याची किंमत मोजावी लागते; बीडमध्ये अजित पवार बोलता बोलता बरंच बोलले!

Beed Ajit Pawar Speech: "आपल्याला संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं सुसंस्कृत राजकारण पुढे घेऊन जायचं आहे. त्यांचं बेरजेचं राजकारण पुढे घेऊन जायचं आहे. पण हे बेरजेचं राजकारण करत असताना मला पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगायचंय की, पक्षात एखाद्याला घेताना त्याचं रेकॉर्ड तपासून पक्षात घ्या. मी काल रात्री बीडच्या दौऱ्यावर येण्याआधी इथल्या एसपींकडून आज माझ्या दौऱ्यात जे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, त्यांचं रेकॉर्ड मागवून घेतलं. आपण लोकांना काही गोष्टी सांगत असताना आपल्या अवतीभोवतीही चुकीच्या प्रवृत्तीचे लोक असता कामा नयेत. एखादी गोष्ट हलक्यात घेतली तर त्याची किंमत पक्षाला आणि त्या नेतृत्वालाही मोजावी लागते," असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचक इशारा दिला आहे. बीडमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांत झालेल्या विविध घटनांमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी नाचक्की झाली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या अनेक निकटवर्तीयांचा गुन्हेगारी घटनांमध्ये सहभाग आढळून आल्याने पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्ह्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या युवा संवाद कार्यक्रमात पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगारी घटनांपासून दूर राहण्याचा कानमंत्र दिला आहे.

अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की, "बीड जिल्ह्याला अनेक समाजसुधारकांचा वारसा लाभला आहे. मात्र मागच्या काही काळापासून जिल्ह्यात चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी डोकं वर काढलं आहे. हे आपल्याला सर्वांना मिळून थांबवायचं आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावं. फक्त मी भाषणात हे सांगून होणार नाही. समाजात जातीजातीत झालेला दुरावा आपल्याला संपवावा लागणार आहे. बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याचं काम आपल्या सर्वांना करावं लागेल," असं आवाहन त्यांनी केलं आहे.

"सर्व गँग्सना सुतासारखं सरळ करणार"

"आपल्या जिल्ह्यात राख, वाळू, भूमाफिया अशा गँग वाढल्या आहेत. पण या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करायचं आहे. त्याला आता पर्याय नाही," असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे.

"ते कंत्राटदार ब्लॅकलिस्ट करणार"

"मी बीड जिल्ह्यात विविध विकासकामांना निधी देणार आहे. पण स्कॉड पाठवून या कामांची पाहणी केली जाईल आणि चुकीचं काम करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाईल. तसंच पदाधिकाऱ्यांनी पत्र दिलं तरी विकासकामांसाठी १० लाखांचा निधी मिळणार नाही. ई टेंडर निघावं यासाठी १५ लाखाचे टेंडर काढणार," असंही यावेळी अजित पवारांनी सांगितलं आहे.
 

Web Title: the party and the leadership also have to pay the price Ajit Pawar statement in beed speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.