परळी (बीड) : तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सरपंच व सदस्यपदाची रविवारी शांततेत निवडणूक पार पडली. मात्र, आज दुपारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कन्हेरवाडीतील लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास पॅनलचे प्रमुख माजी सरपंच राजेभाऊ फड यांच्यावर हल्ला झाला. तसेच त्यांचे दोन समर्थक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही वेळ तणाव होता. हल्लेखोर हे गावातीलच होते असे सांगण्यात आले.
आज दुपारी राजेभाऊ फड हे आपल्या मित्रासोबत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या कन्हेरवाडीतील तिघांचा आणि फड यांच्यात वाद झाला. यातून फड यांच्यावर हल्ला करण्यात आला असल्याचे समजते. राजेभाऊ फड त्यांच्या इतर दोघांवर परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. हल्लानंतर घटनास्थळी तातडीने पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सायंकाळी सात पर्यंत याप्रकरणी गुन्ह्याचे नोंद झाली नव्हती.
प्रचारात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याने ही निवडणूक चांगलीच गाजली होती. मतदानानंतर रविवारी सायंकाळपर्यंत कुठलीही कुरबुर झाली नाही. फड यांच्यावर हल्ला करणारे कोण होते हे मात्र समजू शकले नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मात्र मोटरसायकल व खुर्च्यांची तोडफोड झाल्याचे दिसून आले.