बीड : दहा एकर बागायती शेती, लाखोंचे बँक बॅलेन्स, शेतीत राबणारे कुटुंब, पण सोन्याचा संसार. घरात आई-वडील, पती-पत्नी व दोन चिमणी पाखरं. मात्र, पतीच्या प्रेमप्रकरणाने सुखी संसार उद्ध्वस्थ झाला. आई जिवानिशी गेली, पती तुरुंगात गेल्याने दोन निरागस भावंडे जन्मदात्यांच्या प्रेमाला पारखी झाली. रंजेगाव (ता. बीड) येथील महिलेच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उलगडा केला. हो चूक झाली, आता मला गोळी घाला असे म्हणत शीघ्रकोपी स्वभावाच्या पतीने थरारपट उलगडला.
तालुक्यातील रंजेगाव येथील ज्योती दिनेश आबुज (२९) या महिलेचा गळा आवळून खून करून पतीला चॅनेलगेटला बांधून ठेवल्याच्या प्राथमिक माहितीअधारे पोलिसांनी ५ जून रोजी सकाळी ६ वाजता तपास सुरू केला. चार ते पाच चोर घरात आले व पत्नीला संपवून मला चॅनेलगेटला बांधून ठेवले, हीच स्टोरी दिनेश रंगवून सांगत होता. हे सांगताना नाटकी आश्रूही ढाळत होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या पाहणीत मृत ज्योतीच्या अंगावरील दागिने सुरक्षित आढळले, तसेच घरातील ऐवजही जागेवर होता. त्यामुळे दिनेशवर सुरुवातीपासूनच संशय होता.
उपअधीक्षक संतोष वाळके, पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव, एम. एन. ढाकणे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, हवालदार मनोज वाघ, रामदास तांदळे, सोमनाथ गायकवाड व राहुल शिंदे यांनी दिनेश आबुजला तुझीच फिर्याद घेत आहोत, असे सांगून त्यास बोलते केले. त्यावर तो काहीसा तणावमुक्त झाला. त्याच्या चेहऱ्यावरील बदललेले हावभाव व बोलण्यातील विसंगतीचे निरीक्षण करून पोलिसांनी त्याच्यातील खुनी हेरला. त्याने आधी चोरांची सांगितलेली स्टोरी हा बनाव असल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कारमयत ज्योतीचा भाऊ केदार पांडुरंग करांडे (रा. सिंदफणा चिंचोली, ता. गेवराई) यांच्या फिर्यादीवरून दिनेश आबुजवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. आदिती (वय १०) व आदर्श (वय ७) ही निरागस भावंडे जन्मदात्याच्या प्रेमाला पारखी झाली, त्यांना मामाने आजोळी नेले आहे. जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. सायंकाळी रंजेगाव येथे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार केल्याची माहिती सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी दिली.
भावाच्या आत्महत्येनंतर मिळाले होते ७० लाखदिनेश आबुजच्या धाकट्या भावाने सहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आयुर्विम्याचे जवळपास ७० लाख रुपये मिळाले होते. या पैशांची गुंतवणूक केली होती. मात्र, हाती बक्कळ पैसा आल्याने तो मौजमजा करायचा. यातूनच नात्यातील तरुणीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. तिच्याशी त्याला लग्न करायचे होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
घरात चोरी झाल्याचा एकही क्ल्यू मिळाला नाही. शिवाय चौकशीदरम्यान त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली. आरोपी शीघ्रकोपी स्वभावाचा आहे. प्रेमप्रकरणाची माहिती झाल्यामुळे पत्नीला संपविल्याची कबुली त्याने दिली.- संतोष वाळके, उपअधीक्षक, बीड