- संजय खाकरेपरळी: लोकांसाठी आपण राजकारणात आहोत, स्वतःच्या परिवाराच्या भल्यासाठी नव्हे, मला सामान्य, बहुजन व वंचिताची सेवा करायची आहे, त्यामुळे मी जी भूमिका घेते ती छातीठोकपणे घेते. माझे नेते अमित शहा असून मी त्यांना भेटणार आहे आणि माझ्याविषयी मोकळंपणे विचारणार आहे, असं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी परळी येथे बोलताना सांगितले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनी परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगडावर आज ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित करण्यात आले, यावेळी कीर्तनानंतर पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ठपणे उपस्थितासमोर मांडली. राजकीय परिस्थिती जी गेल्या पाच वर्षात उदभवली, त्याचा दोष परिस्थिती ला देते. 5 वर्षात ज्या घटना घडल्या, विविध राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवत नाही उलट काही जण माझ्या खांद्यावर बंदूक ठेवतात,असे ही पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी थकणार नाही.. मी थांबणार नाही.. मी झुकणार नाही हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे वाक्य आपणा सर्वांना आठवत आहे, त्यांच्या विचाराचे महात्म आपण कधीही कमी होऊ देणार नाही. आपणही उपेक्षित वंचित व बहुजन लोकांसाठी काम करणार असल्याची घोषणा, पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना केली. गोपीनाथराव मुंडे यांनी ओबीसीची जनगणना ,मराठा आरक्षण व बहुजनांच्या हिताची वेळोवेळी भूमिका घेतली आहे,असे ही त्यांनी सांगितले.