बीड : युवासेनेचे काही पदाधिकारी एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्याच अनुषंगाने महिन्यापूर्वी युवा सेना विस्तारकांनी चार दिवस बीड मुक्कामी थांबून माहिती घेतली होती. त्यानंतर आता युवा सेना सचिववरून सरदेसाईदेखील दोन दिवस बीड मुक्कामी आहेत. प्रत्येक विधानसभानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे घेणार आहेत.
काही महिन्यांपूर्वीच राज्यात अनेक घडामोडी घडल्या. सरकार तर बदललेच परंतु शिवसेनेत फूटही पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदार भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले. राज्यातील अनेक आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाकडे धाव घेतली. तसेच बीडमधीलही माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक यांनी शिंदे गटात जात जिल्हाप्रमुख पदाची माळ गळ्यात पाडून घेतली तसेच जिल्ह्यातील इतर शिवसेना व युवा सेनेचे काही पदाधिकारीही शिंदे गटात गेले होते. त्याच अनुषंगाने युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभर विस्तारक पाठवून आढावा घेतला होता.
त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीडमध्येही विस्तारक ॲड. परिक्षित पाटील चार दिवस मुक्कामी होते. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासह काही सामान्य नागरिकांशीही संवाद साधला होता. त्यांच्यानंतर आता युवा सेना सचिव वरून सरदेसाईदेखील मराठवाडा दौऱ्यावर आले. बीड जिल्ह्यात दोन दिवस मुक्काम करून ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक, मेळावे घेणार आहेत. त्यांच्यासमवेत बीडमधील सर्व पदाधिकारीही असणार आहेत. हा दौरा शिवसेनेतील बंडखोरी टाळण्यासाठीच असल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्येष्ठ, निष्ठावंत शिवसैनिकांचा सत्कारबंडखोरी थांबविण्यासाठी शिवसेना व युवा सेनेने कंबर कसली आहे. त्याच अनुषंगाने आजही काही निष्ठावंत, ज्येष्ठ कार्यकर्ते शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे अशा लोकांचा बीड शहरातील पिंगळे गल्लीत १५ सप्टेंंबरला सायंकाळी ७ वाजता वरूण सरदेसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. संपर्कप्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, विस्तारक ॲड. परिक्षित पाटील, विपुल पिंगळे, सागर बहिर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी दिली.