- सखाराम शिंदेगेवराई : दोन महिने होऊनही साखर कारखान्याने उसाचे पैसे दिले नाहीत. यामुळे कर्ज फिटेन या विवंचनेत मंगळवारी एका शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन केले होते. या शेतकऱ्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.दरम्यान, शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून केलेला व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
तात्यासाहेब हरिभाऊ पौळ ( ४०, रा. लुखामसला ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पौळ यांनी त्यांचा दोन एकर ऊस अहमदनगर तालुक्यातील पियुष शुगर लि. वाळकी येथील कारखान्यात दोन महिन्यांपूर्वी गाळपास दिला. मात्र, अनेक वेळा मागणी करून सुध्दा त्यांना पैसे मिळाले नाही. डोक्यावर कर्ज असल्याने ते व्यथित होते. नैराश्यातून मंगळवारी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. माहिती मिळताच त्यांना बीड येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
व्हिडिओ झाला व्हायरल विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर पौळ यांनी एक व्हिडिओ काढला बनवला होता. माझे उसाचे बिल आले नाही, डोक्यावर कर्ज आहे. आता द एंड करतो, असे पौळ म्हणताना व्हिडिओत दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल, एक मुलगी असा परिवार आहे.