- अनिल महाजनकिल्लेधारूर (बीड) : शेतातील उभा ऊस साखर कारखान्यास जात नव्हता. त्यातच कोरोनाचे संकट आणि अवकाळी पावसात झालेल्या विजेच्या गडगडाटात वीज पडून दोन बैल जागीच मरण पावले. ही घटना घडली १९ मार्च २०२१ रोजी. त्यास आता दोन वर्षे झाले तरी शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहे. प्रशासनाकडे चकरा मारून थकल्यामुळे तहसीलदारांना निवेदन देत आता महाराष्ट्र दिनापासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
धारूर तालुक्यातील आरणवाडी गावातील शेतकरी वामन शिनगारे यांची शेतात बांधलेली बैलजोडी वीज पडून 19 मार्च 2021 रोजी मरण पावली होती. या घटनेची माहिती शासकीय यंत्रणेला देण्यात आली. पशुवैद्यकीय विभागाने शवविच्छेदन करीत अहवाल दिला. त्यानुसार शेतकरी मदतीसाठी पात्र ठरला. सुरुवातीला कोरोनाचे संकट सांगून लवकरच मदत मिळेल असे सांगण्यात आले. यासाठी सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून घेतली. त्यास दोन वर्ष झाले. मदत मिळण्याच्या आशेपोटी शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारून बेजार आहेत. प्रशासन कोरोना काळातील मदत शासनाने अद्याप पर्यंत दिली नसल्यामुळे शेतकऱ्यास मदत मिळाली नसल्याचे कारण सांगते. वीज पडून माणूस किंवा जनावर दगावल्यास दोन ते तीन दिवसात संबंधितास मदत दिली जाते. मात्र दोन वर्षे उलटून ही मदत मिळत नसल्याने व तहसील कार्यालयात चकरा मारूनही बेजार झाल्याने अखेर वामन शिनगारे यांनी १ मे पासून धारूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचे निवेदन तहसीलदारांना वामन शिनगारे यांनी दिले आहे. यावेळी आरणवाडीचे सरपंच भागवत शिनगारे, माजी सरपंच लहू फुटाणे उपस्थित होते.
शेतातच उभा राहिला ऊसराज्यात २०२१ मध्ये ऊसाचे पीक जास्त झाल्यामुळे अनेकांचा ऊस साखर कारखान्याना गेलाच नाही. शेवटच्या टप्प्यात ऊस गेला त्यांना पदरमोड करावी लागली. वामन शिनगारे यांचा ही २०२१ मध्ये पाच एकर ऊस जून पर्यत शेतातच उभा होता. कर्ज काढून तो घालवावा लागला. या संकटामुळे कर्जबाजारी झालेले असतानाच नैसर्गिक संकटात शेती कसण्याचे साधन असलेली बैलजोडी मरण पावली. त्यात शासकीय मदतीपासून ही वंचित राहिले आहेत.