बीड : गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे एका वस्तीवर भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडताना आरोपीला मुलांनी पाहिले. ते ओरडताच तो वाऱ्याच्या वेगाने धावत शेतात लपला. वस्तीवरील लोकांनी पाठलाग केल्यावर त्याने थेट विहिरीत उडी घेतली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या साहाय्याने त्यास विहिरीबाहेर काढून बेड्या ठोकल्या. २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता हा प्रकार घडला.
टोण्या ऊर्फ सोपल भाऊसाहेब काळे (२४,रा. पिंपळगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद, मूळ गाव लखमापुरी ता. शेवगाव, जि. अहमदनगर) असे त्या आरोपीचे नाव आहे. प्रभू सखाराम दाभाडे (रा. पाडळसिंगी) हे वस्तीवर वास्तव्यास आहेत. २० रोेजी ते शेतात कुटुंबासह कामासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत टोण्या काळे याने मोठ्या कटावणीने कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. याच वेळी मुलांनी त्यास पाहिले. त्यांना पाहून तो शेतात पळाला व दडून बसला. मुलांनी फोन करून प्रभू दाभाडे यांना कळविल्यावर ते वस्तीकडे आले. तोपर्यंत वस्तीवरील इतरांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, लोकांच्या तावडीत न सापडण्यासाठी शेतातून बाहेर येत तो धावत सुटला. टोण्या पुढे व ग्रामस्थ मागे, असा खेळ रंगला. इतक्यात त्याने पाण्याने भरलेल्या एका विहिरीत उडी घेतली. पाण्यावर तरंगत विहिरीत तो लपून बसला. यानंतर गेवराई पोलिसांना पाचारण केले. प्रभू दाभाडे यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
एक दिवसाची पोलीस कोठडीआरोपी टोण्या ऊर्फ सोपल काळे यास २१ रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्याकडून कटावणी हस्तगत केली आहे. त्याच्यावर आष्टीत चोरीचा, तर शेवगाव (जि. अहमदनगर) येथे बलात्काराचा गुन्हा नोंद आहे. अधिक तपास सुरू असल्याचे सहायक उपनिरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले.