बीड : कुटुंबीयांच्या संमतीने होऊ घातलेल्या आंतरजातीय विवाहाच्या पूर्वसंध्येला सख्ख्या बहिणीसह नियोजित वरावर भावाने चाकूने हल्ला केला. शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भररस्त्यात २७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, धनंजय दीपक बनसोडे (रा. शाहूनगर, बीड) असे हल्लेखोराचे नाव आहे. तो फरार असून त्याचा शोध सुरु आहे. त्याची बहीण रुपाली (२५) हिचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, पतीचे आजारपणात निधन झाले. तिला एक मुलगा आहे. याेगेश विनायक बागडे (२९, रा. धोंडीपुरा, सराफा लाईन,बीड) याच्याशी रुपालीचा २८ फेब्रुवारी रोजी नोंदणी पद्धतीने विवाह होणार होता. योगेशचेही यापूर्वी लग्न झालेले असून पहिल्या पत्नीशी त्याने रीतसर फारकत घेतलेली आहे. या विवाहास दोन्हीकडून संमती होती. मात्र, रुपालीच्या भावाचा विरोध होता.
दरम्यान, विवाहानिमित्त रुपाली व योगेश हे खरेदी करत होते. ते सारडा संकुलाजवळ आले. यावेळी रुपालीचा भाऊ धनंजय बनसोडे हा तेथे आला. त्याने दोघांवर चाकूने सपासप वार केले. दोघांनी आरडाओरड केल्यावर लोक जमा झाले. त्यानंतर धनंजयने तेथून पोबारा केला. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप, सहायक निरीक्षक महादेव ढाकणे, हवालदार महेश जोगदंड, अविनाश सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दोन्ही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लग्नाला विरोध असल्याने भावाने दोघांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीचा शोध सुरु आहे. जबाब नोंदविल्यावर गुन्हा नोंद करुन पुढील कार्यवाही केली जाईल.- रवी सानप, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, बीड