बीड : जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीत चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला आहे. ज्या ठिकाणी २४ तास कडेकोट सुरक्षा असते त्या इमारतीतच चोरी झाल्यामुळे, आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी करून चोरट्यांनी एकप्रकारे प्रशासनास आव्हान दिल्याचे चित्र आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा संच इमारतीच्या छतावर बसवला आहे. त्याठिकाणी १२० बॅटऱ्या एका खोलीत बसवण्यात आल्या आहेत. मात्र, त्यापैकी ४ बॅटऱ्या चोरट्यांनी लंपास केल्याचे दुरुस्तीदरम्यान गुरुवारी महाउर्जा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर, प्रशासन जागे झाले आहे.बॅटऱ्या चोरी गेल्यामुळे मागील ५ महिन्यापासून हा संच निकामी झाला होता. मात्र, कडेकोट बंदोबस्त असताना देखील चोरी झाल्यामुळे, जिल्हा प्रशासनाचे मुख्य कार्यालय तरी सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ऊर्जा साठवून वीज निर्मीती करण्यासाठी २० कि.व्हॉ. पॉवरच्या १२० बॅटऱ्यांचा संच छतावरील एका खोलीत ठेवला आहे. मात्र, लाखों रुपये खर्च करुन देखील हा सौर ऊर्जा संच बंद अवस्थेत होता. त्यामुळे तो सुरु करण्यासाठी महाऊर्जा या कंपनीशी संपर्क साधला, त्यानंतर हा संच दुरुस्त करण्यासाठी कंपनीचे काही कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांना १२० बॅटऱ्यांपैकी ४ बॅटऱ्या चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यानंतर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या पत्रावर निवासी उपजिल्हाधिकारी यांना याची माहिती दिली.