सीसीटीव्हीची मागणी
गढी : येथे बीड, गेवराई व माजलगावला जोडणाऱ्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या रस्त्यावर दिवस-रात्र वर्दळ असते. गेल्या काही दिवसांपासून छोटे-मोठे अपघात होत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेऱ्यांची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.
वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक
बीड : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडींमधून उसाची वाहतूक केली जाते. परंतु, या वाहनांमधून ऊस नेला जात असताना क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून नेला जात असल्याने अनेकवेळा वाहनांना याचा भार सोसला जात नाही. यामुळे अनेक वेळा या वाहनांचे अपघातही होत आहेत. तरीही याकडे संबंधित मालक, वाहनचालक दुर्लक्ष करीत आहेत.
वाहने हटवावीत
तेलगाव : येथील चौफाळा परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरच उभी राहतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे कधी कधी वादाचे देखील प्रसंग उद्भवत आहेत. याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ही वाहने हटविण्याची मागणी होत आहे.
जादा भाड्याचा भुर्दंड
पाटोदा : तालुक्यातील ग्रामीण परिसरात विविध भागात खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नाही. खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून जादा भाडे घेऊन लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. ग्रामीण भागात बस नसल्याने हा भुर्दंड सोसावा लागत आहे.
दुभाजकातील झाडे बहरल्याने सौंदर्यात भर
बीड : शहरातील दुभाजकांच्या मध्ये नगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरणासाठी झाडे लावण्यात आली आहेत. पाऊस व पाणी दिल्यामुळे ती चांगलीच बहरली असून, शहरात ती सुशोभित दिसू लागली आहेत. या झाडांना नियमित पालिकेकडून पाणी दिले जात असल्याने वाढ चांगलीच होत आहे. मात्र, कटई करण्याची देखील गरज आहे. ज्यामुळे झाडे रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा येणार नाही.