गेवराई (जि. बीड) : तुमच्या मुलाला लॉटरी लागली असून, तीन तोळे सोने व १ लाख ३० हजार रुपयांची कार मिळणार असल्याची थाप मारून एका ठगाने महिलेकडून रोख ८० हजार रुपये व ११ ग्रामचे दागिने घेऊन पोबारा केला. ही घटना शहरातील दाभाडे गल्लीत २४ सप्टेंबरला घडली.
आशा दिलीप राऊत (५०, रा. दाभाडे गल्ली) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा औरंगाबादला कंपनीत नोकरी करतो. २४ सप्टेंबर रोजी आशा राऊत यांच्याकडे सकाळी दहा वाजता ४० वर्षीय अनोळखी इसम आला. त्याने तुमचा मुलगा गणेश यास लॉटरी लागली असून, कारही मिळणार असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. आशा वाघ यांच्याकडून त्याने लॉटरीचे बक्षीस सोडविण्यासाठी रोख ८० हजार रुपये व ११ ग्रामचे दागिने घेतले. शहरातील कारच्या एका शोरूमजवळ नेऊन मी आतमध्ये जाऊन आलो, तुम्ही थांबा, असे सांगितले. त्यानंतर ठगाने पळ काढला.