बीड : जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंप चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. विद्युत पंपाच्या किमती वाढल्या आहेत. त्यात पंप चोरीला गेला, तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
रस्ता रुंदीकरणाची मागणी
आष्टी : मांदळी - धानोरा - सावरगाव रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या रस्त्यावरून श्रीक्षेत्र मांदळी, सावरगाव येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ, मढी, पैठण येथे भाविक मोठ्या प्रमाणात जातात. यामुळे गेल्या काही वर्षांत या रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. तरी या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
कडा येथील पुलाच्या दुरुस्तीची गरज
आष्टी : आष्टी तालुक्यातील कडा येथे नगर - बीड रोडवर असलेल्या पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. हा पूल आता कालबाह्य झाला आहे. पुलाचे कठडे तुटले आहेत. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये - जा असते. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
बसस्थानक परिसरात दुर्गंधी
वडवणी : शहरातील नगर पंचायत कार्यालयाच्या परिसरात वाहतूक नियंत्रक कक्ष चालतो. याठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृह नसल्याने स्वच्छतेअभावी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. बसस्थानक परिसर स्वच्छ करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत
बीड : शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक नगर रोडवर अनेक शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच मंगल कार्यालये आहेत. येथे असलेल्या गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे नसून सूचना फलकही लावलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत आणि सूचना फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.