शहरातील जुने बीॲन्डसी क्वार्टर, बुखारी शाळेजवळ राहात असलेले परळी येथील उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून कलीम जेनुद्दीन सय्यद
यांच्या घरी २३ जानेवारी रोजी चोरी झाली होती. यात ६२ हजार रुपये रोख, पाण्याच्या दोन इलेक्ट्रीक मोटारी, एक फॅन, चांदीचे चेन, आधारकार्ड, पॅनकार्ड, ए. टी. एम. व टकाई कंपनीची एल. ई. डी. टी. व्ही. असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला होता. कलीम जैनुद्दीन सय्यद यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुुुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे यांच्याकडे होता. त्यांना काही इसमांचा संशय आल्याने त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून त्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शोधपथक तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे २७ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बागवान गल्ली, माजलगाव येथून आरोपी सोहेल इलियास इनामदार (२५), सय्यद तोफीक गफार (३६) दोघे रा. बागवान गल्ली, माजलगाव यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील चोरून नेलेला मुद्देमाल परत दिला. तर इम्रान अलीम इनामदार (२२, रा. बागबान गल्ली, माजलगाव) हा फरार झाला आहे. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे, पोलीस नाईक शरद पवार, रमेश तोटेवाड, गणेश तळेकर, पोशिपाई सागर इंगळे यांनी ही कारवाई केली.
मोबाईल चोरही ताब्यात
पोलीस क्वार्टरजवळ राहणारे विठ्ठल विश्वनाथ बोबडे यांच्या दुसऱ्या मजल्यावरून पंधरा दिवसांपूर्वी पहाटे दोन मोबाईल चोरीला गेले होते. याचा तपासदेखील शहर पोलिसांनी लावला असून, दत्ता उध्दव गिरी (रा. ढेपेगाव, ता. माजलगाव, मुक्काम नाळवंडी रोड, बीड) याच्याकडून एक मोबाईल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी दिली.