माजलगाव :
गळ्यावर शस्त्र ठेवून धाक दाखवत तालुक्यातील राजेगाव येथे जबरी चोरी करण्यात आली. यावेळी चोरट्यांनी रोख रकमेसह दीड लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
तालुक्यातील राजेगाव येथील किराणा दुकानाचे व्यापारी जगदीश रामलाल मालू (वय ४२) हे आपल्या कुटुंबासह याठिकाणी राहतात व घरातूनच किराणा दुकान चालवतात. मंगळवारी रात्री दहा वाजता जेवण करून मुख्य चॅनेलचे गेट लावून मालू झोपले होते. यावेळी त्यांनी वडील आजारी असल्याने घरातील दरवाजे वडिलांना रात्री बाथरूमला वारंवार जावे लागत असल्याने उघडे ठेवले होते. जगदीश मालू रात्री साडेबारा वाजता लघवीसाठी उठून झोपले.
दरम्यान त्यानंतर तासाभराने चॅनलचे गेट तोडून चेहऱ्यावर मास्क बांधलेल्या चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या आवाजाने त्यांची पत्नी पूजा उठल्या आणि जोराने ओरडल्या. यावेळी चोरट्यांनी घरातील सर्वांना शस्त्राचा व हातातील टांबीचा धाक दाखविला. जगदीश मालू यांच्या पत्नीच्या गळ्याला चाकू लावून १७ ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण, तीन ग्रॅम कानातील बाजीगल, दहा ग्रॅम सोन्याचे लाॅकेट, व पाच-पाच ग्रॅमच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, यासह दुकानातील गल्ल्यातील दीड हजार रुपये असा एकूण १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवारी रात्री उशिरा जगदीश मालू यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेगाव येथे झालेल्या धाडसी चोरीमुळे परिसरातील नागरिकात घबराट निर्माण झाली आहे.