अंबाजोगाई ( बीड ) : शहरातील मध्यवर्ती आणि दाट वस्तीच्या भागातील माळी चौक भागात आज पहाटे चार चोरट्यांनी धुमाकूळ घालत कुमार गायकवाड आणि त्यांचे भाडेकरू उमाकांत देशमुख यांच्या घरी जबरी चोरी करत पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांनी मानेला चाकू लावल्याने एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी कुमार बाळनाथ गायकवाड यांचे अंबाजोगाई शहरातील सावता माळी चौकात स्वतःचे घर आहे. त्यांच्याच इमारतीत ममदापूर पाटोदा येथील उमाशंकर भैरूसाहेब देशमुख हे कुटुंबासहीत भाड्याने राहतात. शुक्रवारी रात्री दोन्ही कुटुंबातील सदस्य नित्यनेमाने जेवण करून झोपी गेले. आज दि. ३ फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास तोंडाला काळे फडके बांधलेल्या चार चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीची जाळी काढून आत प्रवेश केला आणि गायकवाड कुटुंबियांना उठविले. कुमार गायकवाड यांच्या पत्नी कुसुम यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांनी जीवे मारण्याची धमकी देत कुमार यांची सोन्याची अंगठी, कुसुम यांच्या कानातील सोन्याचे दोन झुंबरजोड, सरपाळे, मनीमंगळसूत्र, मिनीगंठन बळजबरीने काढून घेतले. ‘पैसे कहां है बताओ नाही तो मार दुंगा’ असा दम देऊन कुसुम यांच्याकडून कपाटाची किल्ली घेतली आणि हँडबॅगमधील रोख ८ हजार रुपये, पँटच्या खिशातील रोख १० हजार रुपये आणि सोन्याचे पट्टी गंठन काढून घेतले. नंतर त्यांच्या मुलाच्या खोलीत जावून त्याचा मोबाईल फोडला आणि तिथे झोपलेल्या मुलीच्या गळ्यातील मनीमंगळसूत्र, कानातील झुमके, कपाटातील रोख ४ हजार रुपये काढून घेतले.यावेळी झालेल्या झटापटीत कुमार यांच्या मुलीच्या गळ्याला आणि हाताला चाकू लागून त्या किरकोळ जखमी झाल्या.
त्यांनतर चोरट्यांनी कुसुम यांच्या गळ्याला चाकू लावून भाडेकरू उमाकांत देशमुख यांच्या खोलीकडे नेले आणि आवाज देऊन त्यांना उठविण्यास सांगितले. देशमुख यांच्या पत्नीने दरवाजा उघडताच तीन चोरट्यांनी देशमुख आणि त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या गळ्याला चाकू लावत पाच ग्रामचे मनीमंगळसूत्र, रोख २ हजार रुपये आणि मुलीचा मोबाईल काढून घेतला. यानंतर चोरट्यांनी पोलिसात गेलात तर उद्या येऊन खल्लास करूत अशी धमकी दिली आणि ते निघून गेले. जवळपास ४५ मिनिटे चोरट्यांचा हा धुमाकूळ सुरु होता. दोन्ही घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ७४ हजाराचा ऐवज लांबविला. याप्रकरणी कुमार गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांवर कलम ३९४, ३४ अन्वये अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक तड्से हे करत आहेत.
दरम्यान, चोरीची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे आणि सहा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बीड येथून श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते, परंतु विशेष काही हाती लागले नाही. चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या देत चोरी करण्याची मागील काही वर्षातील ही पहिलीच घटना असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.