अतिक्रमणांकडे
होतेय दुर्लक्ष
गेवराई : शहरातील बसस्थानकासह शासकीय कार्यालयांच्या इमारत परिसरात अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर हातगाड्यांची गर्दी असते. याबाबत येथील नागरिक तक्रारी करत आहेत.
उघड्या रोहित्रामुळे अपघाताचा धोका
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील मोंढा परिसरात असलेले विद्युत रोहित्र उघडे असून, त्याचे फ्यूज फुटलेले आहे. तुटक्या फ्यूजआधारे वीजपुरवठा सुरू आहे. रोहित्र उघडे असल्याने या परिसरात अपघाताचा धोका नाकारता येत नाही. महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने नवे फ्यूज बसवण्याची मागणी होत आहे.
अवैध धंदे जोमात ; नियंत्रणाची मागणी
पाटोदा : परिसरात बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरु आहेत. हॉटेल, पान टपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरीत्या दारुची विक्री होत आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वरिष्ठांनी लक्ष घालून नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे.
रस्ते खोदून ठेवल्याने वाहनांचे नुकसान
अंबाजोगाई : शहर व परिसरात तसेच ग्रामीण भागात रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. तसेच लहान मोठे मातीचे ढीग यामुळे एसटी बस व खासगी वाहने आदळून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वाहने खिळखिळी होत असल्याने आर्थिक नुकसान हाते. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती लवकर करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.