माजलगाव : शहरात मागील आठवड्यात अनेक ठिकाणी चोऱ्यांचे गुन्हे घडलेले असताना पोलिसांना अद्याप तपास लागलेला नाही. मोटारसायकल चोरीच्या अनेक घटना घडूनही त्याविषयीचे गुन्हे दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने नागरिकांत रोष व्यक्त होत आहे. शहरात मागील आठवड्यात २-३ ठिकाणी चोऱ्या झाल्या. पोलिसांना अद्याप यापैकी एकाही घटनेचा तपास लागला नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच शहरात २-३ दिवसआड मोटारसायकल चोरीच्या घटना घडत आहेत. चार दिवसांपूर्वी शहरातील ३-४ ठिकाणांवरून मोटारसायकल चोरीचे प्रकार झाले होते. याबाबत नागरिकांनी शहर ठाण्याला कळवले. काही नागरिकांनी दिलेल्या तक्रारीला पोलिसांनी केराची टोपली दाखवण्याचे काम केले.
मोटारसायकल चोरीचा गुन्हा का दाखल झाला नाही. याबाबत संबंधित वाहनधारक विचारणा करतात तेव्हा उडवा-उडवीची उत्तरे मिळतात. मोटारसायकल सापडेल इकडे तिकडे पाहा, १०-१५ दिवसांत गाडी नाही सापडली, तर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे उत्तर पोलिसांकडून मिळत असल्यामुळे अनेक जण मोटारसायकल चोरी होऊनही तक्रार देण्यास टाळाटाळ करत आहेत.
चोरीच्या घटनांचा तपास सुरू असून, यासाठी आम्ही पथकांची नेमणूक केली आहे, तसेच मोटारसायकल चोरीचा तपास सुरू आहे.
-धनंजय फराटे, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे