परळी: नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तीन राज्यांत भाजपची सत्ता आली आहे, त्या राज्यांमधील लाडली बेहेना योजना, ओबीसी आरक्षण मार्गी लागलेले आहे. हे आपल्या राज्यात लागू झाले तर सरकारला लोकांच्या दारापर्यंत येण्याची गरज पडणार नाही, तर लोक दाराबाहेर येऊन आपल्याला पुन्हा संधी देतील, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे विषय मार्गी लावावेत, असे माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या परळी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होत्या.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणेच पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. यावेळी सुरुवातीलाच पंकजा मुंडे यांचे भाषण झाले. अनेक कोपरखळ्या मारत त्यांनी भाषण केले. त्या म्हणाल्या, मी जेव्हा आज मंचाकडे बघत होते, तेव्हा मला फार गरम होत होतं. मला वाटलं आत्ता डिसेंबरच्या महिन्यात एवढं गरम का होत आहे? मग माझ्या लक्षात आलं की शिंदे, पवार आणि फडणवीस हे तिघंही परळीच्या या एका मंचावर आले आहेत. पण त्याहीपेक्षा इथे थोडा पारा जास्तच वाढलाय. कारण धनंजय मुंडे व पंकजा मुंडेही एकाच मंचावर आलेले आहेत.
विकासासाठी कोणत्याही व्यासपीठावर जाईलमला माध्यमांनी विचारलं की ‘ताई या कार्यक्रमात तुम्ही आलात हे प्रमुख आकर्षण आहे का?’ मी म्हटलं इथे जे बसले आहेत, त्यांच्याकडे बघता माझ्याकडे संवैधानिक अशी कोणतीही भूमिका नाही. पण जिल्ह्याची पाच वर्षं पालकमंत्री म्हणून काम करत असताना मनापासून इच्छा होती की वैद्यनाथ तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा. फडणवीस मुख्यमंत्री असताना या योजनेचं आम्ही बीजारोपण केलं. पण काही कारणास्तव ती योजना पुढे जाऊ शकली नाही. मी धनंजयचं अभिनंदन करते की आता ही योजना पुढे जाईल. त्यासाठी २८६ कोटी रुपयांचा निधी आहे. मी एवढंच सांगेन की अत्यंत चांगलं काम या माध्यमातून व्हावं”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. तसेच आपण विकासाच्या मुद्द्यावर कोणत्याही व्यासपीठावर जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.