परळी: रेल्वे स्थानकातील एका रेल्वेत सोमवारी एका युवकाने फटाका स्वतः च्या तोंडात फोडल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र यावेळी झालेल्या आवाजाने रेल्वेतील आणि स्थानकातील प्रवासी भयभीत झाले होते. यामुळे स्थानकाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यातच स्थानक परिसरात सी. सी. टि .व्ही कॅमेरेच लावले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आधीच येथे अपुरा सुरक्षा कर्मचारी वर्ग असल्याने स्थानकाच्या सुरक्षाव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
परळी रेल्वे स्थानकात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यातून रेल्वे येतात त्यामुळे हजारो प्रवाश्याची येथे रेलचेल चालू असते. मात्र प्रवाशांच्या सुरक्षा विषयी पुरेसी काळजी प्रशासनाने घेतली नसल्याचे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी स्थानकात उभ्या परळी- अकोला रेल्वेच्या लोको पायलटच्या कॅबीनमध्ये घुसून एकाने रेल्वे चालू करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत पिस्टल बाळगल्याचा प्रकारसुद्धा उघडकीस आला होता. असे गंभीर प्रकार होऊन सुद्धा रेल्वे प्रशासन सतर्क होत नाही.
येथील रेल्वेस्थानकात रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बल असे दोन पोलीस स्टेशन आहेत पण दोन्ही ठाण्यात कर्मचारी संख्या अपुरी आहे. परळी रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द उदगीर पर्यंत आहे. तसेच रेल्वे स्थानकात सी. सी. टि .व्ही कॅमेरे लावले नाहीत, केवळ रेल्वे कार्यालयाच्या ठिकाणीच सीसीटीव्ही कॅमेरे लावलेलं आहेत त्यामुळे रेल्वे पोलिसांवर कामाचा व्याप जास्त आहे. यामुळे नोव्हेंबरमध्ये दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक परळी दौऱ्यावर असताना त्यांना भेटून परळी रेल्वे स्थानकात सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्याची व परभणीला नवीन रेल्वे पोलीस ठाणे सुरू करण्याची मागणी केली असल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे जी. एस .सौंदळे व वंदे मातरम संघटनेचे दिलीप जोशी यांनी दिली आहे.