परळी : येथील रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे आदेश नसल्याने कोणीही प्लॅटफॉर्म तिकीट काढत नसल्याचे दिसून आले. सोमवारी रेल्वे तिकीट काऊंटरवर चौकशी केली असता, प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध नाहीत, अशी माहिती सांगण्यात आली. प्लॅटफॉर्म तिकीट घेण्यासंदर्भात रेल्वेस्थानक परिसरात कुठलाही बोर्ड आढळून आला नाही. पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. केवळ विशेष रेल्वे गाड्याच परळी रेल्वे स्थानकामार्गे धावत आहेत. कोरोना परिस्थितीमुळे रेल्वे स्थानकावर गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्मचे तिकीट दर १० रुपये करण्यात आले. परंतु त्याची अंमलबजावणी येथील रेल्वेस्थानकावर अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांसोबत वॉकिंगला येणारे, विनाकाम फिरणारे स्थानकात आढळून येत आहेत.
परळी स्थानकातून या रेल्वे सुरू आहेत
नांदेड- पनवेल,पनवेल - नांदेड काकीनाडा -शिर्डी, शिर्डी - काकीनाडा -सिकंदराबाद -शिर्डी, शिर्डी - सिकंदराबाद, विजयवाडा -शिर्डी, शिर्डी- विजयवाडा, औरंगाबाद- हैदराबाद, हैदराबाद - औरंगाबाद बंगळुरू - नांदेड, नांदेड- बंगळुरू कोल्हापूर - नागपूर, नागपूर - कोल्हापूर, कोल्हापूर - धनबाद, धनबाद-कोल्हापूर, आदिलाबाद -परळी, परळी -आदिलाबाद.
वर्षभर होता ३० रुपयांचा भुर्दंड
रेल्वे स्थानकात प्रवाशांसाेबत येणाऱ्या स्थानिक नागरिकांना प्लॅटफॉर्म तिकीट घ्यावे लागत होते. यासाठी ३० रुपये शुल्क आकारणी होती. आता हे शुल्क दहा रुपये करण्यात आले. परंतु अद्याप परळी स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री सुरू झालेली नाही.
कोरोना परिस्थितीमुळे रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून प्लॅटफॉर्म तिकिटाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पूर्वी रेल्वे स्थानकाच्या गेटवर रेल्वेचे अधिकारी येणारे-जाणारेकडे तिकीट आहे का? याची चौकशी करीत असतो. परंतु सध्या तसे दिसत नाही. -बालाजी गायकवाड परळी.
रेल्वे अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीबाबत अद्याप रेल्वे प्रशासनाकडून परळी रेल्वे स्थानकाला आदेश आलेला नाही. जेव्हा तसे आदेश येतील तेव्हा, प्लॅटफॉर्म तिकीट विक्री सुरू करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया परळी रेल्वे स्टेशनमधील वाणिज्य विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.