बीड : जिल्ह्याच्या बाहेर व जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यासाठी ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. मागील ६ दिवसांपासून पोलीस प्रशासनाकडे जवळपास ८ हजार ५०० अर्ज जणांनी ई-पाससाठी ऑनलाईन अर्ज केले होते. यातील प्रवासाची कारणे तपासून त्यांना परवानगी दिली जात असून, यातील मोठ्या प्रमाणात अर्जदार हे रुग्णालयात दाखवण्यासाठी व नातेवाईकांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी जाणारे आहेत. त्यांना पासची पूर्तता करण्यासाठी बीड सायबर विभागास २४ तास कार्यरत आहेत.
दिवसेंदिवस कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध प्रवासाच्या संदर्भात घातले आहेत. दरम्यान २६ एप्रिल पासून प्रवासासाठी ई-पासची सक्ती करण्यात आली आहे. अत्यावश्यक कारण असेल तरच, तरच पोलीस प्रशासनाच्या सायबर विभागातून प्रवास पास दिला जात आहे. यामध्ये नातेवाईकांचा मृत्यू त्यांच्या अंत्यविधीसाठी जायचे आहे. तसेच रुग्णालयात उपचारासाठी व लग्नासाठी प्रवास ही प्रमुख कारणे अर्जावर असतात. आतापर्यंत ८ हजार ५०० अर्जापैकी सायबर पोलिसांनी छाननी करून त्यातील २ हजार जणांना ई-पास दिले आहेत. तर, दररोज येणारे अर्ज त्याच दिवशी निकाली काढण्यावर सायबर विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे अर्ज प्रलंबित राहण्याचे प्रमाण देखील कमी आहे. प्रवासासाठी अत्यावश्यक कारण नसणे, गरजेचे कागपत्र जोडलेले नसल्यास अर्ज नामंजूर केले जात आहे.
ई-पाससाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत
ई-पाससाठी पोलीस प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या संकेतस्थळावर दररोज मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. मात्र, बहुतांश अर्जदार केवळ माहिती भरून अर्ज सबमिट करतात. त्यासाठी अत्यावश्यक कारण काय आहे हे नमुद करत नाहीत. तसेच अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रेही अपलोड करत नाहीत. त्यामुळे अशा पासला मंजुरी दिली जात नाही. नागरिकांनी प्रवासाचे कारण योग्य दिले व आवश्यक ती कागपत्रे अपलोड केल्यास सायब विभागाकडून परवानगी दिली जाते.
असा करावा ई-पाससाठी अर्ज
https://covid19.mahapolice.in या वेबसाईटवर जाऊन स्वत:ची माहिती, फोटो व ज्या कामासाठी प्रवास करायचा आहे. त्या कामाच्या संदर्भातील कागपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. माहिती कागपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदारास संकेतिक क्रमांक प्राप्त होते. तो सांकेतिक क्रमांक पुन्हा वेबसाईटवर टाकल्यास हा ई-पास परवानगी दिली असेल तर डाऊनलोड करून घेता येतो.
दोन तासाच्या आत पास देण्याचा प्रयत्न
नागरिकांनी ई-पास देण्याची जबाबदारी सायबर विभागाकडे आहे. त्याठिकाणी दोन पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. ते दिवस रात्र काम करून अर्जाची तपासणी करून परवानगी देतात. त्यामुळे रोज आलेले पास रोज वितरीत करण्यावर भर आहे. तसेच पास आल्यानंतर दोन तासाच्या आत संबंधितांना मिळावा यासाठी प्रयत्न केला जातात, अशी माहिती सायबर विभाग प्रमुख पोलीस निरिक्षक आर.एस गायकवाड यांनी दिली.