लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : तालुक्यातील पांगरी, पांगरी कॅम्प येथील कार्डधारकांना डिसेंबर २०२०पासून स्वस्त धान्याचे वाटप झालेले नाही. याबाबत तहसीलदारांंनी ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे कार्डधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी तक्रार ॲड. परमेश्वर गित्ते यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
तेरा वर्षांपासून पांगरी, पांगरी कॅम्प येथील एपीएल, बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, शेतकरी योजनेच्या चारशे कार्डधारकांना तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार यांचे नियंत्रणाखाली घरपोच अन्नधान्य वाटप करण्यात येत होते. मात्र, तलाठ्याच्या एका पत्रावरून परळी तहसीलदारांनी तेरा वर्षांपासूनची सुरळीत चालू असलेली घरपोच अन्नधान्य वितरण व्यवस्था बंद केली. वडखेल येथील दुकानदारांना जोडून दिल्यापासून डिसेंबर २०२० ते मे २०२१ या सहा महिन्यांपासून पांगरी, पांगरी कॅम्प येथील एपीएल, बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा योजनेतील कार्डधारकांना गहू, तांदूळ इत्यादी अन्नधान्याचे वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे कार्डधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
लॉकडाऊन केल्यापासून मजुरांना काम मिळत नाही. शासनाचे मोफत धान्य मिळत नाही. जिल्हाधिकारी यांनी तत्काळ या प्रश्नाची सोडवणूक करुन पांगरी, पांगरी कॅम्प येथील कार्डधारकांना तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली घरपोहोच अन्नधान्य वितरण करावे, अशी मागणी ॲड. परमेश्वर गित्ते यांनी केली आहे.
.....
पांगरी, पांगरी कॅम्प येथील कार्डधारकांना डिसेंबर २०२०पासून तहसीलदार परळी यांनी अन्नधान्य वाटप करण्यासाठी काहीच ठोस उपाययोजना केल्या नाहीत.
- ॲड.परमेश्वर गित्ते, पांगरीकर.
...
बीडच्या प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी एक महिन्याचे धान्य स्वस्त धान्य दुकानदार व तलाठी यांच्या उपस्थितीत वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत.
- बाबुराव रुपनर, नायब तहसीलदार, परळी.