- अविनाश मुडेगांवकरअंबाजोगाई - अंबाजोगाईत कोरोनाबाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू आहे. रुग्णांना दिले जाणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे मिळत आहे. शासनाने सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण ज्या मेनुप्रमाणे ठरवून दिले आहे. त्याची कसलीही अंमलबजावणी होत नाही. जे जेवण मिळते. ते निकृष्ट दर्जाचे. शिवाय उशिरा. पिण्यासाठी गरम पाणी नाही. पिण्यासाठी जे पाणी मिळते त्यातही सातत्याने अनेकदा जार संपलेले असतात. अथवा उशिरा येते. अशा पद्धतीने येथे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय सुरू आहे.
शासनाच्या वतीने कोरोना रुग्णांची दक्षता व काळजी घेण्यासाठी शासन कोट्यावधी रुपयांचा खर्च करत आहे. मात्र, अंबाजोगाईत कोरोनाच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू आहे. कोरोना रुग्णांना शासनाच्या आहार परिपत्रकाप्रमाणे सकाळी ७ वाजता आयुष काढा. सकाळी ८ वाजता एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे मध. सकाळी ९ वाजता ग्रीन टी, मूगदाळ,मोसंबी अथवा नाष्टा, यामध्ये इडली सांबर, अननस, तुळशी तीन, मटकी, टरबूज, पोहे, उपमा, राजमा, हरभरा, खरबूज, अंडी, यापैकी एक प्रकार दररोज द्यायचा आहे. तर दुपारी एक वाजता दिल्या जाणाऱ्या जेवणात पनीर भाजी, फुलका, वरणभात, सलाद, हिरव्या पालेभाज्या, दुपारी पाच वाजता आयुष काढा अथवा अद्रक चहा, रात्री आठ वाजता खिचडी, कढी, सलाद, चिक्की तर रात्री नऊ वाजता एक कप हळदीचे गरम दुध या प्रमाणे आठवडाभराचे मेनू ठरलेले आहेत. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करून कंत्राटदार निर्धास्त आहे. अशा निष्कृष्ट अन्नाच्या पुरवठ्याने रुग्णांची प्रकृती आणखी खालावण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
कंत्राटदाराने नेमला उपकंत्राटदार या ठरलेल्या मेनुप्रमाणे, रुग्णांना सकस आहार मिळणे क्रमप्राप्त आहे. हा अध्यादेश असूनही अंबाजोगाई शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह, अभियांत्रिकी महाविद्यालय व रुग्णालयात इतर एका ठिकाणी असे सर्व मिळून दररोज २५० जणांचा अन्नपुरवठा करण्यासाठी बीड येथील एका कंत्राटदाराला हे भोजनाचे कंत्राट देण्यात आले आहे. बीडच्या कंत्राटदाराने अंबाजोगाईत उपकंत्राटदार नेमून त्याच्या मार्फत अन्नपुरवठा सुरू केला आहे.
पाण्यासाठीसुद्धा पहावी लागते वाट कोविडच्या रुग्णांना दिला जाणारा अन्नपुरवठा हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. पोळ्या कच्च्या अथवा वाळलेल्या असतात. वरण पातळ असते. भाजीला चव नसते. दिल्या जाणाऱ्या भातासाठी वापरण्यात येणारा तांदूळ हा दर्जाचा नाही. सलाद म्हणून केवळ दोन काकडीच्या छोट्या फोडी व एक छोटीशी लिंबाची फोड दिली जाते. हिरव्या पालेभाज्यांचा तर समावेशच जेवणात नसतो. रुग्णांना गरम पाणी पिण्यासाठी देणे आवश्यक असताना गरम पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. आहे ते पाणीही वेळेवर येत नाही. जार न आल्याने अनेकदा पाण्याची वाट पाहत बसण्याची वेळ रुग्णांवर येते.
सकाळचा नाष्टा मिळतो ११ वाजता जे निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते. त्यास मोठा विलंब होतो. सकाळचा नाष्टा कधी १० वाजता तर कधी ११वाजता येतो. जेवण दुपारी दोन अथवा तीन नंतरही मिळते. या सगळ्या अनियमितेतेमुळे रुग्णांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. तसेच रुग्णांची प्रशासनाकडून मोठी हेळसांड होत आहे.
आंबट असल्याने मोसंबी दिली नाहीकोविड कक्षात नियमाप्रमाणे सोमवारी रुग्णांना सकाळच्या नाष्ट्याच्या वेळी मोसंबी देण्याचे नमूद करण्यात आले आहे. आज रुग्णांना मोसंबी का दिली नाही? अशी विचारणा प्रभारी नायब तहसीलदार आशा वाघ यांनी कंत्राटदाराकडे केली असता. मोसंबी विकत घेण्यासाठी बाजारात गेलो होते. मात्र, मोसंब्या आंबट निघाल्याने त्या दिल्या नाहीत. अशी उडवाउडवीची उत्तरे कंत्राटदार अधिकाऱ्यांना देत आहेत.
रुग्णांना नियमाप्रमाणे जेवण द्यारुग्णांच्या वाढत्या समस्या ऐकून भाजपाचे युवानेते अक्षय मुंदडा यांनी आज कोविड कक्षास भेट दिली असता तेथील उपस्थित रुग्णांनी समस्यांचा पाढाच मुंदडासमोर वाचला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंदडा यांनी महसूल प्रशासनास ही माहिती दिली. प्रभारी तहसीलदार आशा वाघ, नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली असता जेवणाच्या दर्जात मोठ्या प्रमाणात तफावत व अनियमितता आढळून आली. रुग्णांना नियमाप्रमाणे व्यवस्थित जेवण द्या. अशी मागणी यावेळी अक्षय मुंदडा यांनी केली
अनियमिततेचा रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलासोमवारी सकाळी अंबाजोगाई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील कोविड कक्षास भेट दिली असता रुग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनामध्ये नियमानुसार मोठी तफावत आहे. याबाबत संबंधित कंत्राटदारास व्यवस्थित जेवण देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच पाहणीत दिसून आलेल्या अनियमिततेचा व समस्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. अशी माहिती प्रभारी तहसीलदार आशा वाघ यांनी लोकमतशी बोलतांना दिली.