लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खाटा अपुऱ्या पडत आहेत. त्यातच काही लोक डीसीएचची व डीसीएचमध्येच राहून उपचार घेण्याचा हट्ट करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोवीड केअर सेंटरमधील खाटा रिकाम्या राहत आहेत. डॉक्टरांनी सीसीसीमध्ये जाण्याचा सल्ला दिल्यानंतरही हुज्जत घालून रुग्णालयातच राहत असल्याचे समोर आले आहे. याचा फटका गंभीर रुग्णांना बसत आहे.
जिल्ह्यात खासगी व शासकीय अशा ९३ आरोग्य संस्थांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचारक केले जात आहेत. या संस्थांमध्ये ७ हजार ६८६ खाटांची क्षमता आहे. ७ हजार ३२४ खाटा मंजूर असून, अद्यापही २ हजार ९८८ खाटा रिक्त आहेत. मागील काहीद दिवसांपासून ऑक्सिजन खाटांची मागणीही वाढली आहे. या खाटा वाढविण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे खाटा उपलब्ध करण्यासाठी यंत्रणेसोबत दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत.
कोविड सेंटरमध्ये ४० टक्के बेड रिकामे
जिल्ह्यात २४ शासकीय आरोग्य संस्था आहेत. येथे ३ हजार ३८६ खाटा मंजूर आहेत. यातील ११७३ खाटा अद्यापही रिक्त असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. परंतु कोविड सेंटरमध्ये लोक जातच नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्याठिकाणी प्रत्येकाला भीती वाटत आहे.
रूग्णांना सौम्य लक्षणे, तरीही रुग्णालयात
ज्यांचा एचआरसीटी स्कोअर ५ पेक्षा जास्त आहे किंवा वय जास्त आहे, ऑक्सिजनची गरज आहे, अशांनी कोरोना वॉर्डमध्ये राहणे आवश्यक आहे. परंतु ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांच्यासाठी कोविड सेंटर तयार केलेले आहेत. येथे डॉक्टर, परिचारिका उपलब्ध असतात. परंतु रुग्ण कोविड केअर सेंटरकडे फिरकतच नाहीत.
रुग्णांची बेड मिळविण्यासाठी वणवण
सध्या सर्वत्रच खाटा अपुऱ्या पडत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वत: लक्ष घालत ४८० ऑक्सिजन खाटा तयार करण्याचे नियोजन केले. परंतु केवळ माहिती नसल्याने खाटा मिळविण्यासाठी वणवण सुरूच होती.
कोट,
ज्यांना लक्षणे जास्त आहेत, अथवा कोमॉर्बिड आजार किंवा प्रकृती चिंताजनक असेल तर त्यांनी रुग्णालयांत थांबावे. परंतु सौम्य लक्षणे असल्यास रुग्णालयातील हट्ट सोडून सीसीसीमध्ये दाखल व्हावे. ऑक्सिजन खाटा इतर रुग्णांसाठी जीवदान ठरू शकतात.
- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड