येथील गणेशपार भागातील खंडोबा मंदिर जवळील नागरिक आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसापासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. याठिकाणी येण्या- जाण्यास रस्ता ओबडधोबड असल्याने व व्यवस्थित नसल्याने लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. मोटरसायकलवर घेऊन आलेल्या वृद्ध महिलांनाही या रस्त्यावरून आपण पडतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे दरम्यान शहरातील लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी ही नागरिकांतून पुढे आली आहे. सोमवारपर्यंत परळी तालुक्यातील २४ हजार ५०० नागरिकांना आतापर्यंत लस देण्यात आली.
परळी तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरातील खंडोबा मंदिर परिसरातील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य विभागाच्या वतीने लस देण्यात येत आहे. परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात यापूर्वी शहरातील नागरिकांना लस देण्यात आली परंतु गेल्या आठ दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालयात न देता खंडोबा मंदिर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येत आहे. या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाण्याचा रस्ता व्यवस्थित नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.नगरपरिषदेने हा रस्ता व्यवस्थित करावा, अशी मागणी सामजिक कार्यकर्ते अतुल तांदळे यांनी केली आहे.
परळी शहरात एकाच ठिकाणी लसीकरनाची सद्या सोय आहे. त्यामुळे शहरातील इतर भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. मंगळवारपासून लस साठा नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहरासाठी कोरोना प्रतिबंधक लस साठा वाढून लस केंद्र वाढवावीत.
डॉ. शालिनी कराड, परळी.
परळी शहर व परिसरात लसीकरण केंद्र वाढवावे. ग्रामीण भागात अधिक लक्ष दिले पाहिजे.
- प्रकाश चव्हाण माकप -
परळी तालुक्यात मंगळवारी लस संपल्याने पुन्हा लस साठा मिळावा अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांच्या कडे केली आहे. लस साठा येताच नागरिकांना लस देण्यात येतील.
डॉ.लक्ष्मण मोरे, तालुका आरोग्य अधिकारी परळी.