कडा (बीड) : महावितरणच्या विद्युत तारेचे घर्षण होऊन लागलेली आग आटोक्यात न आल्याने २५ एकर ऊस आगीत जळाला असल्याची घटना सराटेवडगांव येथे घडली. ऊस जळाल्याने १३ शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आष्टी तालुक्यातील मेहकरी येथील शेतकरी यांची सराटेवडगांव येथे शेतजमीन आहे. गुरूवारी संध्याकाळी सातच्या सुमारास शेतातुन गेलेल्या विद्युत तारेचे घर्षण झाल्याने पडलेल्या ठिणग्यानी पेट घेतला. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण आग आटोक्यात येऊ पर्यंत १३ शेतकऱ्यांचा २५ एकर ऊस जळुन खाक झाल्याची घटना गुरूवारी घडली.
घटनेची माहिती मिळताच तलाठी मोहन पाचंगे, जे.एन.राऊत यांनी सदरील घटनेचा पंचनामा केला. आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील लोकांनी संध्याकाळी सात पासुन प्रयत्न केले पण आग आटोक्यात आली नाही. शेवटी आष्टी येथून अग्निशामक बंब आला. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजता ही आग आटोक्यात आली. या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
या शेतकऱ्यांचा जळाला ऊस पाटील जगताप, तुकाराम जगताप, सुहास जगताप, सागर जगताप, हरिभाऊ जगताप, रघुनाथ जगताप, राम जगताप, महादेव जगताप, विष्णु जगताप, नंदु जगताप, कानिफनाथ जगताप, कारभारी जगताप, या शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे.