बीड : २९ वर्षीय तरुणाला त्रास होत असल्याने दाखल केले. येथे त्याला ७ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये पाठविले. तेथे बेड असूनही नाही असे सांगत तीन वेळा बाहेर काढले. शेवटी या तरुणाने मंगळवारी दुपारी जमिनीवरच प्राण सोडला. विशेष म्हणजे १२ तास रुग्णालयात असतानाही डॉक्टर, परिचारिकांनी साधी गोळीही दिली नाही. उपचारातही हलगर्जी झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी आक्रमक होत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. जिल्हा रुग्णालयातील या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
बीड तालुक्यातील बाेरफडी येथील गणेश पाडुळे या तरुणाला त्रास होत असल्याने कोरोना चाचणी केली. ती निगेटिव्ह आल्याने सीटीस्कॅन केले. यात स्कोअर सात आला. त्यामुळे सोमवारी पहाटेच्या सुमारास आई महानंदा व मावसभाऊ सुधाकर लोंडे यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे फिवर क्लिनिकमध्ये तपासणी करून ७ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये पाठविले. येथे बेड असतानाही दुसऱ्यासाठी ठेवला असे सांगून त्याला परत खाली पाठविले. असे सकाळपर्यंत तीनवेळा प्रकार केला. त्यामुळे गणेशला अखेर फिवर क्लिनिकमधीलच वऱ्हांड्यात गादी टाकून जमिनीवर झोपवण्यात आले. त्याला ऑक्सिजन अथवा साधी गोळीही दिली नाही. नातेवाईकांनी वारंवार आरएमओला संपर्क करूनही त्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच वॉर्ड क्रमांक ७ व फिवर क्लिनिकमधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी हलगर्जी करून रुग्णाकडे दुर्लक्ष केले, त्यामुळेच तो दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांच्याकडे तक्रारही करण्यात आली आहे.
सीईओंसमोरच नातेवाईकांचा आक्रोश
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे ऑक्सिजन प्लांटची माहिती घेण्यासह जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेत होते. याच दरम्यान नातेवाईक तिथे आले. त्यांनी आपली कैफियत मांडत आक्रोश केला. यावर कुंभार यांनी अतिरिक्त सीईओ आनंद भंडारी व सीएस डॉ. गित्ते यांना प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना केल्या.
मृत हा नातेवाईक आहे. पहाटे ३ वाजेपासून ते मंगळवारी दुपारपर्यंत १२ तासांत बेड तर दिलाच नाही परंतु, साधी इंटरकॅपही लावली नाही. आरएमओ डॉ. सुखदेव राठोड यांना वारंवार सांगूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. उपचारात हलगर्जी झाल्यानेच आमचा रुग्ण दगावला आहे. आरएमओ राठोड यांच्यावर गुन्हा नोंद करावा.
- दिनेश ढेपे, नातेवाईक
आम्ही तीनवेळा वॉर्ड क्रमांक ७ मध्ये गेलो. बेड असूनही दिला नाही. अखेर माझ्या भावाने जमिनीवरच प्राण साेडला. यात दोषी अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कारवाई करून न्याय द्यावा. यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे.
सुधाकर लोंडे, मृताचा मावसभाऊ
माझ्यावर झालेले आरोप खाेटे आहेत. उपचारात हलगर्जी झाली असेल तर याची चौकशी करून कारवाई केली जाईल.
डॉ. सुखदेव राठोड, अति. जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
तक्रार आली आहे. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीला सांगितले आहे. अहवाल येताच योग्य ती कारवाई केली जाईल.
डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
===Photopath===
270421\27_2_bed_12_27042021_14.jpeg~270421\27_2_bed_11_27042021_14.jpeg
===Caption===
मयत गणेशच्या आईने सीईओंसमोरच आक्रोश केला. त्यांना सावरताना इतर नातेवाईक दिसत आहेत.~फिवर क्लिनिकमध्ये जावून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी माहिती घेतली. यावेळी आपली कैफियत मांडताना नातेवाईक.