केज ( बीड ) : तालुक्यातील सोनेसांगवी येथील एका मागास समाजाच्या वृद्ध महिलेचे निधन झाले. मात्र, गावात त्या समाजाला स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने अंत्यविधी खोळंबला आहे. यामुळे संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी महिलेचा मृतदेह आज सकाळी केज तहसील कार्यालयाच्या आवारात आणत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
सोनेसांगवी येथील वृद्धा लक्ष्मीबाई शहाजी कसबे यांचे मंगळवारी रात्री १०:०० वाजेच्या सुमारास निधन झाले. परंतु मागासवर्गीय समाजाची गावात स्मशानभूमी उपलब्ध लक्ष्मीबाई यांचा अंत्यविधी कुठे करावा हा प्रश्न नातेवाईकांना निर्माण झाला. पूर्वी हे लोक शेजातील माळेगाव येथील सरकारी गायरान जमिनीत अंत्यविधी करीत होते. परंतु त्या गायरान जमिनीत काही वर्षापूर्वी मागासवर्गीय समाजातील भूमिहीन लोकांनी अतिक्रमण करून ते जमीन कसत आहेत. त्यामुळे त्यांना तेथे अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच ग्रामपंचायतीने सोनेसांगवी येथील खुल्या जागेत स्मशाभूमी करण्याचा ठराव घेतलेला आहे. परंतु त्या शेजारील ग्रामस्थांनी यास विरोध केला आहे.
अंत्यविधीस जागाच उपलब्ध नसल्याने संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आज सकाळी १०:०० वाजेच्या दरम्यान मृतदेह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आणत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. परिसरात तणाव निर्माण झाला असून तहसीलदार दुलाजी मेंडके हे सामाजिक कार्यकर्ते रमेश भिसे, सरपंच विजयकुमार ईखे, रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, रवींद्र जोगदंड, मुकुंद कणसे यांच्याशी संवाद साधत आहेत. तसेच युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे आणि केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे व पोलीस कर्मचारी बंदोबस्त ठेवलेला आहे.