धारूर (जि.बीड) : पाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते समृद्ध ग्राम स्पर्धा राज्यात राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातून ४० तालुक्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. यात बीड जिल्ह्यातील ५ तालुक्यांचा समावेश असून स्पर्धेच्या माध्यमातून ही गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहेत. या गावांना भेटी देऊन पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ यांनी नुकतेच मार्गदर्शन केले.
पाणी फाऊंडेशनच्या वतीने राज्यात वॉटर कप स्पर्धेत काम केलेले बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, केज, धारूर आणि आष्टी या पाच तालुक्यांमधील १२७ गावे या स्पर्धेसाठी पात्र असणार आहेत. धारूर तालुक्यातील आमला, देवठाणा, अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ, धानोरा बीड तालुक्यातील मांडवखेल, देवऱ्याचीवाडी, केज तालुक्यातील बनसारोळा, आवसगाव, पळसखेडा, दीपेवडगाव व आष्टी तालुक्यातील आनंदवाडी, सराटे वडगाव या गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धेसाठी गावसभा घेण्यात आल्या. त्यादरम्यान सत्यजित भटकळ यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. आता प्रवेश फॉर्म भरून घेण्याची प्रकिया सुरु आहे.
मार्च व एप्रिल महिन्यांत ४ दिवसाचे निवासी प्रशिक्षण पाच ते सात गावकऱ्यांना देण्यात येणार आहे, त्याचा लाभ गावकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विभागीय समन्वयक संतोष शिनगारे यांनी मार्गदर्शन केले. शासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, गावातील लोक एकत्र येऊन कसा चमत्कार घडवू शकतात, हे या स्पर्धेमधून बळीराजा समृद्ध करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
१८ महिन्यांत करावे लागणार सामूहिक प्रयत्नया गावांमध्ये जल व्यवस्थापन, कृषी उत्पादन वाढ, आर्थिक सुबत्ता आणण्याच्या दृष्टिकोनातून रोपांची लागवड व संगोपन करणे, गवताची लागवड करणे, मातीचा सेंद्रिय पोत सुधारण्यासाठी १८ महिन्यांच्या कालखंडात या स्पर्धेच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. च्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्नांतून यशाचा मार्ग स्वीकारावा या उद्देशाने नुकताच पाणी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ यांनी दौरा केला आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.