- पुरूषोत्तम करवामाजलगाव (बीड) : येत्या काही दिवसात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असा अंदाज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजलगाव विधानसभेचे आ. प्रकाश सोळंके यांनी आज व्यक्त केला. ते येथील बाजार समिती निवडणुकीसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलेले आहे. माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार आणि इतर काही आमदार भाजपसोबत जाण्याच्या विचारात आहेत, अशी चर्चा सुरु होती. मात्र, अजित पवार यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगत चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. दरम्यान, वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी तसेच काही राजकीय अभ्यासक राज्यात लवकरच राजकीय भूकंप होईल यावर मतांवर ठाम आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील राज्यात राजकीय भूकंप नक्कीच होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना आमदार सोळंके म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचे भाजपाचे ध्येय आहे. त्यामुळे सध्याचे राजकारण पाहता येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. मी मागील पंधरा दिवसांपासून मुंबईला गेलेलो नाही. मुंबईत सध्या काय घडामोडी चालू आहे याबाबत मला कसली माहिती नाही. परंतु, माझा ३५ वर्षाचा राजकीय अनुभव पाहता मला असे वाटते की, लवकरच महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल. या पत्रकार परिषदेला बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक हे देखील उपस्थित होते.