बीड : जिल्हा रुग्णालयात नातेवाईक बनून चोरटे फिरल्याचे ऐकले होते. परंतु आता चोरटेही डॉक्टर बनू लागले आहेत. एका चोरट्याने चक्क गळ्यात स्टेथो घालून जिल्हा रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या मदर वॉर्डमध्ये फेरफटका मारल्याचे समोर आले आहे. साधारण पंधरवड्यापूर्वी ही घटना घडली आहे. कक्ष सेवकाला हे समजताच त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्याला बाहेर काढले. या प्रकरणातही पोलीस ठाणे अथवा जिल्हा रुग्णालयात कसलीही नोंद झाली नाही.
जिल्हा रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावर एसएनसीयु विभाग असून येथे नवजात बालकांवर उपचार केले जातात. बाजूलाच्या या बाळांच्या मातांना राहण्यासाठी स्वतंत्र वाॅर्ड आहे. येथे केवळ महिलांनाच प्रवेश असतो. साधारण पंधरा दिवसांपूर्वी एक ३० वर्षे वय असलेला चोरटा एसएनसीयु विभागासमोर आला. तेथे कर्मचारी दिसल्याने तो मदर वॉर्डमध्ये गेला. गळ्यात स्टेथो आणि हातात पिशवी होती. ज्या महिलांच्या अंगावर दागिने आहेत, अशांची टेहळणी करून तो बाहेर पडला. एवढ्यात एका कक्ष सेवकाने त्याला हटकले. त्याला काही प्रश्न विचारल्यावर संशय बळावला. सेवक जास्तच विचारणा करू लागल्याने त्याने खिशात हात घालत काही तरी काढण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात कक्षसेवक मागे हटला आणि सुरक्षा रक्षकांना पाचारण केले. त्यानंतर या चोरट्याला तेथून बाहेर काढण्यात आले. या प्रकाराची जिल्हा रुग्णालयात सर्वत्र चर्चा झाली. परंतु याची अद्याप कोठेही अधिकृत नोंद झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
म्हणे, डबा द्यायला आलोय...कक्ष सेवकाने चोरट्याला, कशाला आलात? असे विचारताच त्याने, आपले नातेवाईक येथे आहेत. त्यांना डबा देण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. परंतु पहाटे ३ वाजता कोण डबा द्यायला येते का? असा प्रतिप्रश्न करताच पुन्हा, आपण फार्मासिस्ट आहोत, असे उत्तर त्याने दिले. त्याचा हावभाव आणि वर्तन पाहून कक्ष सेवकाने सावधगिरी बाळगत त्याला सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले. याबाबत मात्र, कोणीही अधिकृतरित्या बोलायला तयार नसले तरी, या गंभीर प्रकाराने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.