बीड : जिल्ह्यात यंदा चोरीच्या गुन्ह्यांचा आलेख दुपटीने वाढल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. चोरट्यांना पकडण्यात पोलीस यशस्वी ठरत असले तरीही चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात अपयश येत आहे. जिल्ह्यात चोरीचे ५२१, तर घरफोडीचे ९५ गुन्हे अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोना महामारीनंतर जिल्ह्यातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे चित्र आहे. दुचाकी, मोबाइल चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गुन्हेगारी वर्तुळात जुन्या गुन्हेगारांसोबतच नव्यांचा शिरकाव झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलीस ठाण्यांतील डीबी (तपास पथके) सुस्तावले असून सगळा भार गुन्हे शाखेवर आहे. आरोपीला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे हेदेखील कौशल्य आहे. अनेक गुन्हेगार चोरीतील रोख रक्कम खर्च करून टाकतात; तर काहीजण दागिने व मौल्यवान वस्तूंची विक्री करतात. अशा वेळी मुळापर्यंत जाऊन तपास करावा लागतो. यासाठी पोलिसांना मेहनत घ्यावी लागते. आरोपीला अटक केल्यावर २४ तासांच्या आत त्याला न्यायालयात हजर करावे लागते. पोलिसांना पुरेसा वेळ मिळत नसल्याने शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करणे अडचणीचे ठरते.
हे पहा आकडे
१ जानेवारी ते ३१ जुलै २०२१
गुन्ह्याचा प्रकार दाखल उघड गेला माल मिळाला माल
दरोडा १२ १२ ६८ लाख ७२ हजार ६०० ६४ लाख ४१ हजार ५००
चोरी ७४२ २२१ ४ कोटी २७ लाख १२ हजार ५३५ १ कोटी ६ लाख १५ हजार ३०१
जबरी चोरी ३१ २२ ३९ लाख ४४ हजार १५० १८ लाख ९० हजार १५०
घरफोडी १२८ ३३ १ कोटी २६ ला ६ हजार ९४५ ११ लाख ९ हजार ९९९
....
पोलिसांसमोर आव्हान कायम
..
नव्या गुन्हेगारांचा शिरकाव
- कोरोना महामारीमुळे शहरात स्थलांतर केलेल्या अनेकांनी गावची वाट धरली. यातील काहीजणांच्या हाताला काम राहिलेले नाही. त्यामुळे भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. काम करण्याचा कंटाळा, व्यसनाधीनता यांमुळे चोऱ्या करून गरज भागविण्याकडे काहींचा कल वाढला आहे. यातून नवे गुन्हेगार उदयाला आल्याचा
एका अधिकाऱ्याचा अंदाज आहे.
..
सीसीटीव्ही बंदचा फटका
- बीड शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा धोक्यात आहे. १२ दिवसांपूर्वी शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील एका बँकेसमोरून ऊसतोड मुकादमाची एक लाख रुपयांची पैशांची बॅग चोरट्यांनी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू नसल्याने या प्रकरणाचा तपास रखडला आहे.
...
सतर्कता बाळगणे गरजेचे
- सुरक्षेबाबत नागरिकांच्या बेपर्वाईमुळे पोलिसांचे काम वाढते. दुचाकींचे स्विच व्यवस्थित असावे, बाहेरगावी जाताना घराचे दरवाजे बंद करावेत, तकलादू कुलपांऐवजी चांगल्या दर्जांच्या कुलपांचा वापर करावा. अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, रोख रक्कम व मौल्यवान वस्तू सार्वजनिक ठिकाणी बाळगताना सतर्कता बाळगायला हवी.
....
चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न सुरू आहेत. गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यांतील अधिकाधिक मुद्देमाल हस्तगत केला जातो. प्रलंबित गुन्ह्यांचा तपास व रिकव्हरीसंदर्भात वेळोवेळी आढावा घेण्याचे काम सुरू आहे. प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्यात येईल.
- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड