पाटोदा : तालुक्यातील पिंपळवंडी आणि नफरवाडी येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालुन तीन ठिकाणी घरफोडी केली. या घटनेत लाखोंचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लंपास केला. ४ व ८ फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेप्रकरणी अनुक्रमे अंमळनेर व पाटोदा ठाण्यात अज्ञाताविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील नफरवाडी येथे सोमवारी भरदिवसा सकाळी १० ते दुपारी ४ च्या सुमारास चोरट्यांनी शेतकरी नामदेव विठ्ठल मंडलीक यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला नंतर कपाटातील सोने व चांदीचे दागिने तसेच नगदी रक्कम लंपास केली. नंतर चोरट्यांनी मंडलिक यांच्या घराशेजारी राहणाऱ्या ज्ञानोबा तांबे यांच्या घराचे कुलूप तोडून आतील लोखंडी पेटीत ठेवलेली सोन्याची नथ असा एकूण १० लाख ९ हजाराचा ऐवज लंपास केला. दुसरी घटना अंमळनेर ठाणे हद्दीतील पिंपळवंडी येथील पाटील वस्तीवर घडली. चोरट्यांनी हनुमंत भगवान पवार यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्याचे ७४ हजार रुपये किंमतीचे विविध दागिने लंपास केले. याप्रकरणी अंमळनेर ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.