गेवराई (बीड ) : तालुक्यातील कोळगाव येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला. पाच घरे फोडून चोरटे पसार झाले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.
तालुक्यातील कोळगांव येथे मंगळवार रोजी मध्यरात्री चोरट्यांनी गावातील पाच घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अविनाश गवळी, सिंधूबाई काशिद यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील लोकांना जाग आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. त्यानंतर चोरट्यांनी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मदनराव घाडगे यांच्या घराच्या पाठीमागील गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाट फोडून दागदागिने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र घाडगे यांच्या पत्नी जाग्या झाल्या. त्यांनी आवाज करताच चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून पळ काढला. तसेच अविनाश लोंढे यांच्या ही घरात घुसून कपाट,पेटी, डबे यांची मोडतोड करून काही चांदीची नाणे, रोख रक्कम चोरून नेली.
त्यानंतर चोरांनी कल्याण-विशाखापट्टणम या महामार्गालगत असलेल्या उद्धव करांडे यांच्या घरामध्ये चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दरम्यान उध्दव करांडे यांच्यासह घरातील अन्य सदस्य झोपलेल्या दोन खोलीला बाहेरुन लाँक करुन चोरट्यांनी स्वयंपाक घरात असलेल्या पेटी डब्यातील २ तोळे सोने, २० हजारांची रक्कम असा ८० हजारांचा ऐवज घेऊन चोर पळून गेले. हा प्रकार उध्दव करांडे यांच्या लक्षात पहाटे पहाटे उठल्यानंतर आला. तसेच रुमचे दरवाजे बाहेरून बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर उध्दव करांडे यांनी आरडाओरडा केली. यानंतर शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी स्थानकातील पोलीस निरीक्षक विजय देशमुख, सिरसाट, नागरे यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकाला पाचरण करण्यात आले. परंतु चोरांचा मग लागला नाही.