कडा : आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील अरुण रघुनाथ मानकेश्वर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात तोळे सोने लंपास केले. ही घटना २९ जून रोजी घडली होती. २ जून रोजी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मानकेश्वर यांनी केला आहे.
मानकेश्वर कुटूंब हे रात्री एकत्रित जेवण करून झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आणि कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले. मानकेश्वर यांची सून उठल्यानंतर हा प्रकार समोर आला. १ लाख ८८ हजार रूपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. त्यानंतर मानकेश्वर यांनी आष्टी पोलिसांना माहिती दिली. परंतु एकाही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाण्याची तसदी घेतली नाही.
उलट गुन्हा दाखल करून घेण्यात दोन दिवस उशिर केल्याने संताप व्यक्त होत आहे. गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे समजताच मानकेश्वर यांनी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर आष्टी पोलिसांना जाग आली आणि गुन्हा दाखल करून घेतला. सर्व पावत्या असतानाही पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याने अश्चर्य व्यक्त केले जात असून आष्टी पोलीस संशयाच्या भोवºयात सापडले आहेत.