- नितीन कांबळे कडा (बीड) - दरवाजा उघडा ठेऊन अंगणात झोपणे खरकटवाडीतील एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. सर्वजण बाहेर झोपलेले असताना संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश करत दीड लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी रात्री येथे घडली.
आष्टी तालुक्यातील देवळाली गावापासून जवळच असलेल्या खरकटवाडी येथे मच्छिंद्र तान्हाजी तांदळे कुटुंबासह राहतात. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून तांदळे कुटुंब अंगणात झोपले. मात्र यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. हीच संधी साधत उघड्या दरवाज्यातून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील दीडलाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
याप्रकरणी मच्छिंद्र तान्हाजी तांदळे यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार लुईस पवार करीत आहेत.