बीड: जिनिंगमधील वीज बंद केली. त्यानंतर सीसीटीव्हीचे कनेक्शन तोडले. खोल्यांचे दरवाजे बाहेरुन बंद केले व रोखपालाच्या उशाखालील चावीच्या सहाय्याने कपाट व तिजोरी उघडून ४८ लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. २६ डिसेंबर रोजी पहाटे परळी तालुक्यातील कौडगाव घोडा येथील जिनिंगमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.
ओंकार उत्तमराव खुर्पे (४०,रा.नवीन बसस्थानकासमोर, माजलगाव) हे उद्योजक असून त्यांची कौडगाव घोडा (ता.परळी) येेथे जिनिंग आहे. सलग दोन दिवस सुट्या आल्याने २४ डिसेंबर रोजी जिनिंगचे रोखपाल अशोक भीमराव साळुंके व नीलेश विलास देशमुख यांनी परळी येथील एसबीआयमधून जिनिंगख्या खात्यातून ५० लाख रुपये काढून आणले होते. यातील काही रक्कम त्याच दिवशी शेतकऱ्यांना वाटप व ४५ लाख रुपये मुख्य लोखंडी तिजोरीत तर २ लाख ७८ हजार ४०० रुपये लोखंडी कपाटात ठेवले होते. रोखपाल साळुंके व इतर कर्मचारी तेथेच झोपी गेले.
दरम्यान, मध्यरात्री सव्वा बारा वाजता ते सव्वातीन या दरम्यान रोखपाल सोळंके यांच्या उशाखालील चावीने कपाट व मुख्य तिजोरी उघडून चोरट्याने ४७ लाख ७८ हजार ४०० रुपये इतकी रोकड लंपास केली. पहाटे सव्वातीन वाजता साळुंके यांना जाग आली तेव्हा त्यांच्या उशाखाली चावी गायब असल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी काही खोल्यांना बाहेरुन कड्या लावल्या होत्या. वीज बंद करुन सीसीटीव्हीचे कनेक्शनही तोडलेले आढळून आले. ओंकार खुर्पे यांच्या फिर्यादीवरुन सिरसाळा ठाण्यात २७ रोजी पहाटे गुन्हा नोंद करण्यात आला. सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी घटनास्थळी भेट दिली.
तिजोरी साफ करुन केली कुलूपबंदचोरट्यांनी रोख रक्कमेसह बँक पासबुक व चावी देखील लंपास केली. सुरुवातीला केवळ कपाटातील रक्कम गायब अस्याचे निदर्शनास आले. मात्र, लोखंडी तिजोरीची चावी चोरट्यांनी लांबविल्याने त्यातील रक्कम सुरक्षित आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ड्रील यंत्राने ती तोडली तेव्हा ती रिकामी आढळली.