- नितीन कांबळे कडा - चोर कधी काय करतील याचा नेम राहिला नाही. घरफोडी, मंदिरातील दानपेटी, वाहनचोरी, जनावरांच्या चोरी पाठोपाठ आता चक्क चिमुकल्याचे ज्ञानमंदिर असलेल्या शाळेत देखील चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. तालुक्यातील देवीनिमगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चोरते धुलीवंदना दिवशी चोरीच्या उद्देशाने कुलूप तोडून शिरले. मात्र, हाती काहीच न लागल्याने साहित्यांची उचकापाचक करून चोरटे पसार झाले.
आष्टी तालुक्यातील देविनिमगांव येथे पैठण बारामती रोडलगत पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. मंगळवारी धुलीवंदनाच्या शाळेस सुटी होती. हीच संधी साधत चोरट्यांनी दुसरीच्या वर्गाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. परंतु हाती काहीच न लागल्याने वर्गातील साहित्य व कागदांची उलथापालथ करून चोरटे पसार झाले. आज सकाळी शिक्षक शाळेत येताच हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक परसराम पोकळे यांनी सांगितले.
तीन वर्षांपूर्वी शाळेत झाली होती चोरीदरम्यान, या शाळेत ३ वर्षांपूर्वी चोरी झाली होती. एका वर्ग खोलीतून गॅसटाकीसह शेगडी चोरीला गेल्याची घटना घडली होती. आता पुन्हा याच शाळेत चोरीचा प्रयत्न झाल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.