- मधुकर सिरसटकेज : पवनचक्की उभारणीचे काम प्रगतीपथावर असलेल्या तालुक्यातील विडा शिवारात १४ जणांनी दोन सुरक्षारक्षकांचे हातपाय बांधून 12 लाख 87 हजार रुपयांची केबल आणि इतर मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सोमवारी (दि.7) मध्यरात्री 12 वाजण्याच्या दरम्यान विडा शिवारातील पवनचक्की उभारणीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी तोंडाला कपडा बांधलेल्या 14 चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांनी सुरक्षारक्षक अभिजित दुनघव व आकाश जाधव यांना धमकावून दोघांचेही हातपाय बांधले. 4 चोरटे त्यांच्याजवळ थांबले तर इतरांनी टॉवर मधील शिडीचा आधार घेऊन 12 लाख 87 हजार रुपये किमतीचे केबल व इत्तर साहित्य ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व चोरट्यांनी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोबारा केला.
दरम्यान, सुरक्षारक्षकांनी आपली सुटका करून घेत चोरीची माहिती अवादाच्या अधिकाऱ्यांना दिली. वॉचमन आकाश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात 14 चोरट्यांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे पुढील तपास करीत आहेत.
गोदामाला पोलीस पहारा अवादा ऍनर्जी कंपनीच्या गोदामाला बुधवारी (दि. 9 ) सकाळी 10 वाजल्यापासून राज्य राखीव दलाच्या एका तुकडीचा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती अवादाचे अधिकारी शिवाजी थोपटें यांनी लोकमतशी बोलताना दिली.