बीड : येथील जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेटविरोधात आणखी एक गुन्हा वाशी (जि.धाराशिव) पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. ११० ठेविदारांनी एकत्र येत तक्रार दिली आहे. त्यांची ३ कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
याप्रकरणी अध्यक्षासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जास्त पैशाचे आमिष दाखवून जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेटने ठेविदारांना फसविले आहे. १५० ते २०० कोटींच्या ठेवी या मल्टीस्टेटमध्ये असून अडीच हजारापेक्षा जास्त लोकांचा पैसा या बँकेत अडकला आहे. आत्तापर्यंत १२०० ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या असून याची रक्कम ६५ कोटीपर्यंत गेली आहे. त्यामुळे आगोदर बीडच्या शिवाजीनगर, नंतर नेकनूर आणि आता वाशी पोलिस ठाण्यात तिसरा गुन्हा मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावर गुरूवारी दाखल झाला आहे.
आरोपींमध्येे अध्यक्षा अनिता बबन शिंदे, बबन शिंदे, मनीष बबन शिंदे, योगेश करांडे, आश्विनी सुनीता वांढरे, अशोक गोविंद लावंडे, शिवराज शशिकांत बिरबले, शंकर भास्कर हाडूळे, अमोल नामदेव पवार या ९ जणांचा समावेश आहे. अनुरथ बाबुराव महाकले यांनी ही फिर्याद दिली आहे.