बीड : शहरात नियोजन समितीतून लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही लावले होते. मात्र, वीजपुरवठा खंडित झाल्याने तसेच दुरुस्तीची कामे रखडल्याने ऐन सणासुदीत तिसरा डोळा बंद आहे. त्यामुळे शहराची सुरक्षा वाऱ्यावर आहे.
शहराची सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी महत्त्वाचे चौक, रस्ते व सार्वजनिक ठिकाणे सीसीटीव्हीद्वारे नियंत्रित केली होती. यासाठी चार वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च केले होते. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. गणेशोत्सावापाठोपाठ गौराईंचे आगमन होत आहे. त्यामुळे बाजारपेठेतही गर्दी आहे. दरम्यान, काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत पावसाचे पाणी शिरून ते नादुरुस्त झाले आहेत; तर काही वीजपुरवठा खंडित झाल्याने बंद आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक, अण्णा भाऊ साठे चौक, बशीरगंज, बार्शी नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक अशा महत्त्वाच्या ठिकाणी तिसरा डोळा बंद असल्याने सुरक्षा धोक्यात आली आहे. महिलांची छेडछाड, लुटमारीसह मारामाऱ्या अशा गुन्हेगारी घटनांना पायबंद घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असणे गरजेचे आहे. वीज बिलाच्या थकबाकीमुळे महावितरणने शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. सिग्नल बंदच आहेत. त्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वीजपुरवठाही सुरळीत नसल्याने गैरसोयीत भर पडत आहे. बीडचे उपअधीक्षक संतोष वाळके यांनी सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी पालिकेशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. शिवाय मुख्याधिकाऱ्यांशीही बोलणी सुरू आहेत; मात्र, तिसरा डोळा कधी उघडणार, हा प्रश्नच आहे.
...
स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव
सध्या जिल्हा नियोजन विकासमधून शहरात सीसीटीव्ही लावलेले आहेत. मात्र, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सीसीटीव्ही केवळ शोभेचे बाहुले बनले आहेत. आता जिल्हा पोलीस दलाने सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा विचार सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
....
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत, यासाठी पालिका प्रशासनाशी चर्चा केलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही सुरू असणे अत्यंत गरजेचे आहे.
- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड
....