बीड : गुंतवणूकदारांना अधिक व्याजाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टिस्टेटला अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने ९ ऑक्टोबर रोजी तिसरा झटका दिला. मुंबई, बीड, छत्रपती संभाजीनगर व जालना येथील १००२ कोटी ७९ लाख रुपये किमतीच्या जमीन व इमारती जप्त केल्या. आतापर्यंत ईडी पथकाकडून ज्ञानराधा मल्टिस्टेटची १०९८ कोटी ८७ लाख रुपयांची मालमत्ता गोठविण्यात आली आहे.
बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटने हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्यामुळे बीडसह इतर जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत. एक हजार कोटींच्या पुढे फसवणुकीचा प्रकार असल्याने अंमलबजावणी संचालनालयाने ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या फसवणुकीची गंभीर दखल घेतली. जवळपास एक महिन्यापूर्वी बीडमध्ये दाखल होत ‘ईडी’च्या पथकाने बीड येथील मुख्य शाखेतील सर्व व्यवहारांची तपासणी करून ज्ञानराधा मल्टिस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्या प्रॉपर्टीची माहिती घेतली. त्यानंतर राज्यात ज्या-ज्या ठिकाणी मालमत्ता आहेत त्याची पडताळणी करून कारवाई सुरू केली. २० व २१ सप्टेंबर रोजी जळगावसह अहमदाबाद व दिल्लीत छापे मारून तब्बल ७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. पुढे २४ सप्टेंबर रोजी ज्ञानराधा मल्टिस्टेटची मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर व बीड येथील जवळपास ९५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर आता मुंबई, बीड, छत्रपती संभाजीनगर व जालना येथील १००२ कोटी ७९ लाख रुपये किमतीच्या जमीन व बिल्डिंग जप्त केल्या आहेत. आतापर्यंत ईडी पथकाकडून जवळपास १०९८ कोटी ८७ लाख रुपयांची मालमत्ता गोठविण्यात आली आहे. ज्ञानराधा मल्टिस्टेटचे संस्थापक सुरेश कुटे व इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ही कारवाई केली असल्याचे ‘ईडी’च्या वतीने सांगण्यात आले आहे.
आमचे पैसे कधी मिळणार?बीडसह अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांना त्यांच्याकडून गुंतविलेल्या पैशांवर अधिक व्याजाचे आमिष दाखविण्यात आले. गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण होऊनही पैसे मिळत नसल्याने अनेकांनी प्रारंभी तक्रारी केल्या, त्यानंतरही पैसे परत मिळत नसल्याने अनेकांनी कोर्टात धाव घेऊन ज्ञानराधा मल्टिस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे व संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. ईडी कारवाई करीत आहे, ज्ञानराधा मल्टिस्टेटवर लिक्विडेटर नेमण्यात येणार आहे. हे सर्व होत असले तरी आमचे पैसे कधी मिळणार साहेब? असा सवाल गुंतवणूकदारांमधून उपस्थित केला जात आहे.