- मधुकर सिरसटकेज (बीड) : हिंगोली येथील तृतीय पंथी साक्षी ( 20 ) आणि गेवराई येथील जीवन ( 24) दोघांना एकमेकांचे विचार पटले आणि त्यांची मने जुळली. पुढे जाऊन त्यांनी लग्न करुन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, जीवनच्या नातेवाइकांनी यास विरोध केला. विरोधाला न जुमानता प्रेमात आकंठ बुडालेल्या जीवन आणि साक्षी यांनी अखेर घराबाहेर पडत सामाजिक कार्यकर्त्यांचा मदतीने महाशिवरात्री दिनी लग्न केले.
हिंगोली येथील साक्षी नर्सिंगचे शिक्षण घेते तर गेवराई येथील जीवनने पशूधन विकास अधिकाऱ्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तो सध्या केज शहरात खाजगी पशू रुग्णालयात नोकरी करतो. सहा महिन्यांपूर्वी जीवन आणि साक्षी यांची ओळख गढी- बीड रोडवरील टोल नाक्यावर झाली. जीवनचा गावाकडे जाण्याचा मार्ग तोच असल्याने नियमित भेटी होत गेल्या. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याचे मनोमन ठरविले होते. परंतु, समाजात नाचक्की होईल म्हणून जीवनच्या नातेवाईकांनी या विवाहाला विरोध केला.
कुटुंबियांकडून टोकाचा विरोध होत असल्याने दोघे केज येथे आले. येथे सामाजिक कार्यकर्त्या व तृतीयपंथी जिल्हा समितीच्या सदस्या गौरी शिंदे यांची भेट घेऊन दोघांनीही लग्न करून आयुष्यभर सोबत राहणार असल्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर गौरी शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे, योगेश गायकवाड, बबलू साखरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने महाशिवरात्रीच्या दिवशी शहरातील भीमनगर येथील विहारात बौद्ध पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पाडला.