कडा- आष्टी तालुक्यातील धिर्डी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर कारवाई न करताच सोडून दिले, त्याच बरोबर तो टिप्पर सोडण्यासाठी केलेली तडजोड व हप्तेखोरीबाबात त्या दोन पोलीस अंमलदारांत झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल होऊन अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या दोघांची पाठराखण होत असल्याचे दिसून येत आहे.
धिर्डी येथे आष्टी ठाण्यातील एक पोलीस नाईक व पोलीस काॅन्सटेबल या दोघांनी अवैध वाळूची वाहतूक करणारा टिप्पर पकडला होता. कारवाई करण्याऐवजी आर्थिक तडजोड करून तो सोडून दिल्याचे समजताच लोकमतने हा प्रकार समोर आणला. एवढेच नाही तर त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांत तो टिप्पर सोडण्यासाठी आर्थिक तडजोड झाल्याचे बोलले असून, वाळूतील हप्तेखोरी करण्यासाठी काय काय करावे लागते, याचा व्हायरल क्लिपमध्ये उल्लेख आहे.
मागील महिन्यात उपअधीक्षक यांच्या पथकातील एका अंमलदाराने अवैध धंद्यांवर कारवाईला जाण्यापूर्वी व्हॉटस्अपला स्टेटस ठेवले होते. त्यावरदेखील कारवाई झालेली नाही. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होणारच नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
...
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीत जे समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल.
- विजय लगारे, उपअधीक्षक, आष्टी