बीड : पेट्रोलिंग करताना घाटापिंपरी येथे एका हॉटेलसमोर थांबलेल्या लोकांना पोलिसांनी का थांबले असा जाब विचारला. याचा राग आल्याने येथील तिघांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. यावेळी आरोपींनी गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ७ मे रोजी रात्री घडली. याप्रकरणी अंभोरा पोलिसांनी तीन आरोपींविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आष्टी तालुक्यातील बीड-धामणगाव-नगर रोडलगत घाटापिंपरीजवळ असलेल्या हाॅटेल शिवमावळा येथे पाण्याच्या टाकीजवळ पत्र्याच्या शेडसमोर ७ मे रोजी रात्रीच्या वेळी तीन दुचाकी व अन्य लोक विनाकारण उभा होते. यावेळी पेट्रोलिंगवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना विचारणा केली. याचा राग आल्याने त्याठिकाणी असलेल्या भरत उर्फ लुखा शिवराम झांजे, भागचंद शिवराम झांजे, अंगद अनिल झांजे या तिघांनी पोलीस कर्मचारी कल्याण राठोड यांच्या शर्टच्या काॅलरला पकडून ओढत नेले. त्यांना दोघांनी लाकडी दांड्याने मारले. यावेळी आरोपींनी गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुध्द राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लोंखडे करीत आहेत.