बीड : दीड वर्षापासून लोककलावंतांच्या हाताला काम नाही. हतबल आणि कर्जबाजारी झालेल्या या कलावंतांना आर्थिक अडचण जाणवू लागल्याने या लोककलावंतांना आर्थिक सहाय्य देण्याचा मानवतेचा सोहळा मंगळवारी बीडमध्ये पार पडला. प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून अखिल भारतीय नाट्य परिषद आणि बालरंगभूमीच्या बीड जिल्हा शाखेच्या माध्यमातून हा आर्थिक मदत वाटपाचा सोहळा नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ७० कलावंतांना लोकसहभागातून प्रत्येकी ५ हजार अशी साडेतीन लाख रुपयांची मदत वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नटराज पूजन करून स्व. काकू-नाना यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, प्राचार्य दीपा क्षीरसागर, डॉ.सतीश साळुंके, गौतम खटोड, ॲड. श्रीराम लाखे, दिनकर शिंदे, विनोद मुळूक, गणेश वाघमारे, रवींद्र कदम, विकास जोगदंड, भैय्यासाहेब मोरे, प्रभाकर पोपळे, नाट्यशास्त्र विभागप्रमुख संजय पाटील देवळाणकर यांच्यासह ज्येष्ठ कलावंतांची उपस्थिती होती.
के. एस. के. महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित कलावंतांनी आपल्या पारंपरिक कला सादर करत मान्यवरांचे स्वागत केले, तर काहींनी गीत गायन व नृत्य सादरीकरणही केले.
डॉ. दीपा क्षीरसागर म्हणाल्या की, कोरोना महामारीत अनेक लोककलावंतांच्या कलेचे काम बंद झाले आहे. गोंधळी, आराधी, जागरणवाले, पोतराज, ढोलीबाजा, तुतारी, नाट्यकलावंत, संगीत कलावंत, मुरळ्या, वराती नाट्य, मसनजोगी, रायरंद असे अनेक कलावंत अडचणीत सापडले. या कलावंतांना आर्थिक मदत करण्याचा संकल्प केला होता, असे डॉ. क्षीरसागर म्हणाल्या,
नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, बीड शहराची सांस्कृतिक चळवळ व वारसा अखंडितपणे चालू राहावा, यासाठी आपण कलाक्षेत्राला जाणीवपूर्वक प्राधान्य देत आलो आहोत. बीडच्या नाट्यपरिषद बालरंगभूमी परिषदेची ही मदत नक्कीच आधार देणारी ठरेल, असे ते म्हणाले. डॉ. उज्ज्वला वणवे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक, नाट्यशास्त्र विभागाचे सर्व कलाकार, पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते.
250821\25_2_bed_1_25082021_14.jpg~250821\25_2_bed_2_25082021_14.jpg
कलावंताना मदत~कलावंताना मदत