केज : चोरीच्या संशयावरून तिघांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी पहाटे तालुक्यातील हनुमंत पिंप्री येथे घडली. धक्कादायक म्हणजे जमावाने मृतदेह ट्रॅक्टरने गावापासून दूर टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
या बाबत मयताचे सासरे अशोक भिमराव शिंदे ( रा कोठाळवाडी हनुमान वस्ती ता. कळंब जि उस्मानाबाद ) याने दिलेल्या माहितीवरून, जावई शिवाजी नामदेव काळे, मुलगा दीपक अशोक शिंदे व आकाश बापू काळे हे आरणगावकडून काळेगाव हनुमंत पिंप्रीमार्गे बाईकवरून (क्र एमएच २५/ए-२२५५ ) गावाकडे जात होते. १२:०० वाजेच्या दरम्यान आरणगावच्या पुलावरून पाणी वाहत असताना त्यांनी पुलावरून गाडी घातली. गाडीत पाणी गेल्यामुळे गाडी बंद पडली. प्रसंगावधान राखून ते गाडीवरून खाली उतरले. गाडी ढकलत १२:३० वाजेच्या दरम्यान हनुमंत पिंप्री येथे आले. मात्र, चोर समजून जमावाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात शिवाजी नामदेव काळे याचा जागीच मृत्यू झाला. तर दीपक अशोक शिंदे आणि आकाश बापू काळे हे जखमी झाले आहेत.
जमावाने एका ट्रॅक्टरने शिवाजी काळेचा मृतदेह बोरगाव चौक रस्त्याच्याकडेला नेऊन टाकला. त्यानंतर जखमी दीपक शिंदे व आकाश काळे हे भीतीने गावाकडे चालत गेले. याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, बिट जमादार अमोल गायकवाड, अशोक गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच मयताचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे घेऊन आले आहेत. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या शिवाजी काळे याच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पत्नी व आई वडील असा परिवार आहे.