अंबाजोगाई (बीड ) : तलावात पोहताना बुडणाऱ्यास वाचविताना अन्य दोन मुलांचाही दुर्दैवी घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांड्यावर घडली. तिन्ही मुलांचे पालक ऊसतोडणीसाठी सोलापूर जिल्ह्यात गेले असताना इकडे गावात हि दुर्घटना घडली.
विष्णू परमेश्वर चव्हाण (वय १५), नितीन पिंटू चव्हाण (वय १४) आणि अर्जुन परमेश्वर राठोड (वय १२) अशी या तीन मयत मुलांची नावे आहेत. काल मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तांड्यावरील या तिघांसहित पाच मुले परिसरातील एका तलावावर पोहण्यासाठी गेले होते. तलावात पाणी कमीच होते, पण त्यात असलेल्या एकाचा खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यात एकजण अडकून बुडू लागला. यावेळी अन्य दोघांनी त्यास वाचवण्याचा प्रयत्न केला. यात तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या तिघांचेही पालक उसतोड मजूर असून ते सध्या सोलापूर जिल्ह्यात गेलेले आहेत.
या घटनेची खबर त्यांच्या पालकांना देताच त्यांनी गावाकडे धाव घेतली. काल दुपारीच या मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयतांच्या कुटुंबियांचा या दुर्घटनेबाबत कसलाही आक्षेप नसल्याने त्यांनी शासकीय यंत्रणेला याबबत कसलीही माहिती दिली नाही. त्यामुळे आज सकाळपर्यंत या घटनेची कुठेच नोंद नव्हती. सकाळी माहिती झाल्यानंतर महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी कुसळवाडीकडे येथे जाऊन घटनास्थळास भेट दिली. बर्दापूर पोलीस ठाण्याचे जमादार एस. वाय. वाघमारे या प्रकरणाची चौकशी करत आहेत.