बीड : पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृ्त्यू झाल्याच्या घटना सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी उघडकीस आल्या. मयतांमध्ये बीड शहरातील दोन व गेवराई तालुक्यातील साळेगाव येथील एकाचा समावेश आहे.
ओंकार काळे व शिवसंतोष पिंगळे (१६, रा. शिंदेनगर कॅनाल रोड, बीड) हे दोघे सोमवारी दुपारी बाहेर जातो म्हणून घरातून निघाले. नंतर हे दोघेही पाली येथील बिंदुसरा धरणातील सांडव्याजवळ थांबले. बाजूला कपडे, मोबाइल काढून ठेवत ते सांडव्यातील डोहात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, खड्डा खोल असल्याने ते दोघेही डोहात बुडाले. दरम्यान, नातेइवाइकांकडून दोघांचाही शोध घेतला जात होता. तथापि, रात्री उशिरापर्यंत ते न सापडल्याने त्यांनी शिवाजीनगर ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून बिंदुसरा धरणाकडे धाव घेतली. या वेळी त्यांचे मृतदेह आढळले. बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी पथकासह जाऊन मृतदेह ताब्यात घेतले. ग्रामीण ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
गोदावरीत बुडाला तान्हाजीगेवराई : पाण्याचा अंदाज न आल्याने गोदावरी नदीतील डोहात बुडून तान्हाजी लिंबाजी आरबड (१७, रा. सुरळेगाव) याचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील सुरळेगाव येथे मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. यापूर्वी मागील आठ महिन्यांत आठ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. सातत्याने घडणाऱ्या घटना चिंतेचा विषय बनला आहे.